Breaking News

देशात फक्त भांडवलदारांनाच अच्छे दिन ः स्मिता पानसरे

सांगली ः दि. 1 - भांडवलदारांच्या पाठबळावर निवडून आलेल्या शासनाने आपली शक्ती कष्टकरी, श्रमिकांच्या उध्दारासाठी खर्च न करता अंबानी, अदाणीसारख्या भांडवलदारांसाठी खर्ची घातली आहे. त्यामुळे कष्टकरी जनतेचे प्रश्‍न कायम असून, धार्मिक उन्माद माजवत असहिष्णुता निर्माण करत सरकारकडून सुरू असलेले कष्टकर्यांच्या शोषणाचे षड्यंत्र हाणून पाडा, असे आवाहन भारतीय महिला फेडरेशनच्या नेत्या कॉ. स्मिता पानसरे यांनी केले. 
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या राज्य अधिवेशनास येथे सुरुवात झाली. उद्घाटनाच्या कार्यक्रमात पानसरे बोलत होत्या. 
पानसरे म्हणाल्या की, मअच्छे दिनफचा वादा करत सत्तेवर आलेल्या सरकारकडून सर्वसामान्यांच्या समस्यांना बगल दिली जात आहे. भांडवलदारांच्या पाठबळावर निवडून आलेल्या या सरकारने त्यांच्याच विकासाचा नारा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या भांडवलदार उद्योजकांचे मात्र नक्कीच मअच्छे दिनफ आले आहेत. कामगार कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असताना त्यांच्याकडून विरोध होत आहे. आपल्या हक्कासाठी कष्टकरी जनतेने संघर्षासाठी तयार रहावे.
सरकारवर टीका करताना पानसरे म्हणाल्या की, धार्मिक उन्माद माजवून समाजात असहिष्णुतेचे वातावरण सरकार निर्माण करत आहे. श्रमिकालाच श्रमिकाच्या विरोधात उभे करणार्‍या या सरकारकडून मागण्या मान्य करुन घ्यायला संघर्ष करावाच लागणार आहे. राज्यात आशा व गटप्रवर्तकाच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे काम चांगले सुरू असताना त्यांना मिळणारा मोबदला मात्र कमी आहे. त्यांची स्थिती मना घरका ना घाटकाफ अशी झाली आहे. 
सुरुवातीला स्वागताध्यक्ष शंकर पुजारी यांनी आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांच्या समस्या मांडताना मागण्या पूर्ण करण्यासाठी तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला. यावेळी आयटक संघटनेचे सरचिटणीस शाम काळे, आशा व गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष राजू देसले, सचिव सुमन पुजारी, सहसचिव विजय बचाटे, जनस्वास्थ्य अभियानचे डॉ. अभिजित मोरे आदी उपस्थित होते.