उद्योजक होसमणी यांच्या खुनाचे धागेदोरे हाती
सांगली ः दि. 1 - माधवनगर (ता. मिरज) येथील उद्योजक भास्कर होसमणी यांच्या खूनप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्या खुनामागे आर्थिक वादासह अनेक कारणे असल्याचे पुढे येत आहे. एका रिक्षाचालकाला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. चार ते पाच हल्लेखोरांनी खून केल्याचा संशय आहे. त्यापैकी एका हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले आहे. पण खुनानंतर तो रातोरात गायब झाला आहे. त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.
इनाम धामणी ते सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील म्हसोबा मंदिरासमोर भास्कर होसमणी यांचा रात्री साडेनऊ खून करण्यात आला होता. त्यांच्या डोक्यात लाकडी बॅट घालण्यात आली होती. चेहर्यावर धारदार शस्त्राने वार केले होते.
त्यानंतर डोके दगडाने ठेचले होते. घटनास्थळी तीन वेगवेगळे दगड सापडले आहेत. या तीनही दगडांना रक्त लागलेले आहे. त्यांच्या बुलेट मोटारसायकलवरही रक्त पडले होते. घटनास्थळी अंधार असल्याने पोलिसांनी रात्री पंचनामा करण्यास अडचण येत होती. यासाठी त्यांनी लोखंडी बॅरिकेटस् लावून एक पथक तैनात केले होते. दुपारी पंचनामा केला.
होसमणी यांचे पाकीट, रिव्हॉल्व्हर, तीन जिवंत काडतुसे, पेन, मोबाईल हॅण्डसेट रस्त्यावर पडला होता, तर हल्ला केलेल्या बॅटचे दोन तुकडे झाले होते. ही बॅट हल्लेखोरांनी रस्त्याकडेच्या शेतात फेकून दिली होती. डोक्यात घातलेले तीन दगडही शेतात पडले होते. या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत.
होसमणींना हल्लेखोरांनी इनाम धामणी रस्त्यावर बोलावून घेतल्याची शक्यता आहे. खून झाला, त्यावेळी त्यांच्या हाताच्या बोटातील एक अंगठी गायब झाल्याची माहिती आहे. अन्य दागिने त्यांनी घातले होते का नाही, याची पोलिसांना अद्याप माहिती मिळालेली नाही.