Breaking News

नाशिक रोडच्या पीसीटीसीमधील दोन प्रशिक्षणार्थींची भारतीय सैन्यदलात निवड

 नाशिक/प्रतिनिधी। 1 - नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राने (पीसीटीसी) आयोजित केलेल्या सीडीएस परीक्षा मार्गदर्शन कोर्स क्र. 51 मधुन प्रशिक्षण घेतलेल्या अजय कदम आणि सुरभी गुप्ता यांची सैन्यदलात अधिकारी म्हणुन निवड झाली आहे. आज या कोर्सचा सांगता समारंभ प्रशिक्षण केंद्रामध्ये उत्साहात साजरा झाला. 
या सांगता सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळीत उपस्थित होते. त्यांनी व केंद्राचे केंद्राचे प्रभारी अधिकारी ले.कर्नल (नि.) दिलीप गोडबोले यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले.
सैनिक कल्याण विभाग,पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये 17 नोव्हेंबर 2015 ते 30 जानेवारी 2016 या कालावधीत 75 दिवसांचा हा कोर्स कँबाईंड डिफेंस सर्व्हीसेस परीक्षेची पूर्व तयारी म्हणून चालविण्यात आला. या सीडीएस कोर्स नं. 51 साठी चार युवती व 24 युवक अशा 24 जणांची या केंद्रात प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. या कोर्समध्ये विदयार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणा-या सीडीएस परीक्षेसाठी गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी या विषयांची विशेष तयारी करुन घेण्यात आली. यामुळेच या केंद्रातील प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी पैकी अजय कदम व सुरभी गुप्ता यांची सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड झालेली असून ते सध्या अंतिम गुणवत्ता यादीच्या प्रतिक्षेत आहेत. या केंद्राद्वारे महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील नवयुवक व युवतींना भारतीय सैन्य  दला मध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याची ही एक नामी संधी उपलब्ध झालेली आहे. केंद्राचे प्रभारी अधिकारी ले. कर्नल (नि.) दिलीप गोडबोले म्हणाले की, या केंद्रात सीडीएस परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी वर्षातून दोन कोर्सेस चालविले जातात. तथापि येत्या काळात वर्षातून तीन कोर्सेस चालविण्याचा या केंद्राचा मानस आहे. जेणेकरुन महाराष्ट्रातील अधिकाधिक नवयुवक व युवतींना भारतीय सैन्यदलामध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याची आणखी एक मोठी संधी उपलब्ध होईल. या प्रशिक्षणार्थींना विनामूल्य राहण्याची,भोजनाची व प्रशिक्षणाची सोय सैनिक कल्याण विभाग,पुणे यांच्यामार्फत केली जाते. आगामी काळातही महाराष्ट्रातील अधिकाधिक नवयुवक व युवतींनी येथील तज्ञांच्या मार्गदर्शनाचा व विनामूल्य सुविधांचा लाभ घेऊन भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.