गाड्या अडवून लूटमार करणार्या टोळीचा म्होरक्या गजाआड
पुणे (प्रतिनिधी)। 01- गाड्या अडवून लूटमार करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सागर तानाजी येनपुरे(वय,22 रा. हनुमाननगर, केळेवाडी, कोथरूड, पुणे) यास अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्याकडून 35000 रुपये किमतीचा माल व गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या आणि चॉपर हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै 2015 रोजी प्रदीप राजोरीया हे त्यांचे मित्र उत्कर्ष शर्मा व विशाल लाठी यांच्यासोबत रात्री दोन वाजता चांदणी चौकातून पौडच्या दिशेने जात होते. या दरम्यान तीन मोटारसायकलीवरून आलेल्या सहा जणांनी त्यांची गाडी अडवत तिघांना मारहाण केली व चॉपरचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख 3700 व मोबाईल असा 54000रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्याबरोबरच त्याच मार्गावरून पायी जाणार्या सुनील मारूती पडवळ या इसमाला देखील मारहाण करत 11000 रोख व त्याचामोबाईल काढून घेत चोरट्यांनी पोबारा केला होता.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात 11 जुलै 2015 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत सागर तानाजी येनपुरे याला ताब्यात घेउन चौकशी केली असता त्याने गुन्हे केल्याचे कबुल केले. या आरोपीकडून पोलिसांनी 35000 रुपये किमतीचा माल व गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या आणि चॉपर हस्तगत केला आहे. आरोपीची ओळखपरेड घेण्यात आली असून साक्षीदारांनी त्याला ओळखले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील मुख्य आरोपी सागर येनपुरे याने आपली टोळी निर्माण केली असून लूटमारीसारखे गुन्हे तो आणि त्याची टोळी मिळून सातत्याने करीत असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीतील आरोपी हे 17 ते 22 या वयोगटातील असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. 2009 ते 2015 या कालावधीत त्यांनी दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, दंगा, दुखापत यासारखे 21 गुन्हे केले आहेत.