Breaking News

महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नाशिक/प्रतिनिधी। 1 - दिंंडोरी रोडवर मॉर्निंग वॉकसाठी जाणार्या 53 वर्षीय महिलेला भरधाव वेगाने जाणार्या स्कॉर्पिओ वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षियांनी या अपघातीस्थळाकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
दिंडोरी रोडवरील तारवालानगर ते अमृतधाम चौफुलीला जोडणार्या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने या रस्त्यावर दुभाजक, तसेच गतिरोधक टाकावेत, अशी मागणी होत आहे. त्यातच शनिवारी पहाटे  वाजता हा अपघात घडला. या अपघातात लामखेडे मळा येथे राहणार्या आशा शांताराम क्षीरसागर यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. 
आशा क्षीरसागर या नेहेमीप्रमाणे शनिवारी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी तारवालानगर चौफुली ते गुंजाळबाबानगर रस्त्यावरून जात असताना भरधाव वेगाने जाणार्या स्कॉर्पिओने (एमएच 15 डीएम 4843) जबर धडक दिली. यात क्षीरसागर यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्कॉर्पिओचालक फरार झाला होता. मात्र, काही वेळानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या अपघातप्रकरणी क्षीरसागर यांचा मुलगा मयूर क्षीरसागर याने दिलेल्या तक्रारीनुसार स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे, भाजपा व शिवसेना अशा सर्वपक्षीय सदस्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन मनपा प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. पंचवटी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, नगरसेवक रुची कुंभारकर, भाजपाचे धनंजय माने, शिवसेनेचे महेंद्र बडवे आदिंसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी गुंजाळबाबानगर चौफुलीवर हे आंदोलन केले. 
तासभर आंदोलन करूनही महापालिकेच्या कोणत्याही अधिकार्याने घटनास्थळी भेट न दिल्याने संतप्त सर्वपक्षीय सदस्यांनी रस्त्यावरून न उठण्याची भूमिका घेतल्याने अखेर पंचवटी पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांना मनपात चर्चेसाठी नेल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.