Breaking News

डॉ. पी. डी. पाटील यांचा काँग्रेसच्या प्रदेश मागासवर्गीय विभागाकडून निषेध


 पिंपरी (प्रतिनिधी) । 08 - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्याबाबत होत असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील यांच्या गळचेपी भूमिकेचा काँग्रेसच्या प्रदेश मागासवर्गीय विभागाकडून निषेध करण्यात आला.
पिंपरी येथे झालेल्या बैठकीत काँग्रेस प्रदेश मागासवर्गीय विभागाचे संयोजक मनोज कांबळे, गोपाळ मोरे, बापू लोकरे, शरद जाधव, मयुर काळभोर, अ‍ॅड हिम्मत जाधव, विलास लोंढे, विजय कांबळे, दिलीप पांढारकर, किशोर जगताप, विजय रवाणी, दिपक गोपाळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनोज कांबळे म्हणाले की, मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडून या सुसंस्कृत  शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, कोणत्याही राजकीय वादात न पडता सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर 
घेऊन तसेच शहरातील साहित्यिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील मंडळींना सोबत घेऊन संमेलन यशस्वी पार पाडू.  एखाद्या राजकीय पक्षाची मनधरणी करण्यापेक्षा सर्व पक्षांना सोबत घेऊन सकारात्मक भूमिका ठेवावी. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणण्यापेक्षा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या राज्य घटनेचा आपल्यासारख्या त्यांच्या अनुयायांनी कायदेशीर पद्धतीने योग्य त्या प्रकारे निषेध करावा. साहित्यिकांवर हल्ले करु नये. तसेच त्यांच्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करु नये. अशा प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ढाल बनून उभे राहतील, असेही ते म्हणाले. तरी डॉ .पी. डी. पाटील यांनी त्यांची गळचेपी भूमिका बदलावी. संमेलन यशस्वी होण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करेल. अन्यथा होणार्‍या परिणामास सर्वतोपरी आपली जबाबदारी राहील, असा इशारा काँग्रेस प्रदेश मागासवर्गीय विभागाचे संयोजक मनोज कांबळे यांनी दिला आहे.