जागरूक स्त्रियांचे सौंदर्यशास्त्र
प्रत्येक स्त्री आपल्या सौंदर्याबाबत जागरूक असते. किंबहूना तिने तसे असावेच. प्रत्येकीस केवळ चेहर्याचे सौंदर्य वाढवून अथवा त्याच्याबाबत विचार करून चालत नसते किंवा महाग आणि अद्ययावत सौंदर्य-प्रसाधनांचा वापरही तिने केला, की ती सुंदर दिसू लागते, असे नव्हे. त्यासाठी तिचा देहही आंतरिक आणि बाह्य पातळीवर सुंदर हवा.
देहाची सुंदरता व स्त्रीचे सु-आरोग्य या दोन्ही बाबी परस्पर-निगडीत व परस्पर पुरक असतात. सुंदर देहात तेवढाच सुंदर आत्मा वा मन वास करत असणे आवश्यक ठरते, अन्यथा स्त्री-सौंदर्यास उठाव येत नसतो. स्त्रीच्या सौंदर्याचे वर्धन करण्यासाठी तिने आपल्या दैनंदिन जीवनात संतुलीत आहार व नियमित व्यायाम ही द्वीसूत्री विसरू नये. मानवी जीवन सुखी, समाधानी असेल, तर आपोआपच त्याची आभा तिच्या चेहर्यावर पडते. स्त्रीचा निंयत्रीत व पौष्टीक आहार आणि व्यायाम यांची जोडही यास हवी. निसर्गाने आपल्याला केवळ उर्जा, वातावरण, पाऊस, हवा, इ. दिले आहे, असे नाही, तर त्यात उपलब्ध असणारी वनस्पती, फळे भाजीपाला केवळ सु-आरोग्य बनविण्यास नव्हे, तर आपल्याला प्राकृतिक सौंदर्य-प्रसाधने देण्यासही जबाबदार असतात. म्हणूनच आपण आरोग्य, आहार, व्यायाम, व सौंदर्य या महत्वपूर्ण बाबींची सांगड यशस्वीपणे घालून जीवनात समाधान, स्थैर्य आणण्याचे प्रयत्न करणे. ही त्याबाबत उपयुक्त माहिती व या सर्वांचा विचारच आहे.
निसर्गाजवळ नैसर्गिक सौंदर्याचे भांडार भरलेले आढळते. आपण जी कृत्रिम सौंदर्य-प्रसाधने वापरतो, त्यांच्यातील बरेच गुणधर्म यांच्यातही आढळतात. यांच्यामुळे आपल्या शरीरास केवळ सौंदर्य प्राप्त होते असे नव्हे, तर सु-आरोग्यही प्राप्त होत असते.विशेषत: स्त्री- सौंदर्य हे तिच्या त्वचेच्या कांती आणि पोत यावर निर्भर असते. आपल्या दैनंदिन आहारातूनच स्त्रीला आपल्या सौंदर्य व आरोग्यात भर घालण्यास मदत होते. कारण आपल्या सौंदर्यवर्धनास उपकारक अशी प्रथिने, खनिजे, जीवनसत्व इ. आपल्याला स्वयंपाकघरात असणारी फळे, भाज्या, मसाले, डाळी, फूल, पाने, सुके मेवे इ. सर्वांतून या उपकारक घटकांचा मसाला भरलेला असतो आणि जर त्यांचा योग्यवेळी, योग्यप्रकारे वापर केला गेला, तर त्वचेच्या आरोग्य व सौंदर्य- वर्धनास पुष्टी मिळते. आणि मग स्त्रीला कृत्रिम प्रसाधानांची आवश्यकता भासत नाही तिचे रूधिराभिसरण योग्य
प्रकारे होऊ लागते व त्यामुळे तिची कांती सुधारत जाते.