Breaking News

मंत्रिमंडळ विस्ताराचे केवळ गाजर’च

मुंबई, प्रतिनिधी, दि. 1 - भारतीय जनता पक्षातील इच्छुक आणि घटक पक्षांतील नाराज नेत्यांना खूष करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात तसा विस्तार नजीकच्या काळात होणे असंभव असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचे फक्त गाजरच दाखवले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगत असले तरी, अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला नाही. भाजपच्या अध्यक्षपदी अमित शहा यांची फेरनिवड झाल्यानंतर विस्तार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र, शहा यांनी पुन्हा सूत्रे हाती घेतल्यानंतर ज्या राज्यात भाजपची सरकारे आहेत. त्या राज्यातील सरकारच्या कामगिरीची झाडाझडती घ्यायला सुरवात केली आहे. महाराष्ट्रातील सरकारची कामगिरीही समाधानकारक नसून, पक्षाची जनमानसातील प्रतिमा झपाट्याने खालावत चालल्याचे सांगितले जाते. परिणामी, कारभार सुधारा, लोकांमध्ये जा तसेच आमदार, खासदार, मंत्र्यांनी संपर्क अभियान वाढविण्याबाबत लवकरच शहा स्वत: भर देणार असल्याने तूर्तास मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा मागे पडला आहे. 
दरम्यान, भाजपतील इच्छुकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्याचा प्रयत्न केला असता, राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे आव्हानाला सामोरे जायचे आहे, असे उत्तर खुद्द फडणवीस यांच्याकडून मिळत असल्याने विस्तार लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही ज्येष्ठ मंत्री खाती सोडतील, याची शक्यता वाटत नाही. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षांचे विस्ताराकडे लक्ष लागून राहिले आहे. या सर्व घडामोडींमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचे भाजपतील नेत्यांचे म्हणणे आहे.