मुक्त विद्यापीठात गांधी पुण्यतिथी साजरी ; स्वरांजली कार्यक्रमातून वाहिली आदरांजली
नाशिक/प्रतिनिधी। 1 - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनीही महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्प वाहून करून आदरांजली अर्पण केली.
गांधी पुण्यतिथी हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही पाळण्यात येतो. या वेळी सर्वांनी मिनिट मौन पाळले. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक, शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. दरम्यान विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासनाच्या वतीने स्मरण महात्म्याचे या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादच्या स्वरांजली ग्रुपनेसादर केलेल्या या कार्यक्रमातून महात्मा गांधीच्या एकूण जीवन चरित्र आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर आधारित गीतांचे सादरीकरण झाले. स्वरांजली संचाचे प्रमुख प्रा. अंबरीश देगलूरकर, विश्वनाथ दशरथे यांनी गायलेल्या गीतांना रसिकाची वाहवा मिळवली. त्यांना शांतीभूषण चारठाणकर, प्रशांत बराबोटे यांनी तबला तर प्रत्युष कन्नडकर आणि रोहन कदम यांची साथसंगत लाभली. प्रारंभी कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले. महात्मा गांधी अध्यासनाचे प्रमुख डॉ. जयदीप निकम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. राम ठाकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.