Breaking News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं पहिली सामाजिक योजना

 नाशिक/प्रतिनिधी। 1 - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पहिली अन् तीही सामाजिक योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वावलंबन योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या विधवा पत्नीला नियमित उत्पन्नाचे साधन म्हणून नवीन ऑटोरिक्षा परवाना मिळणार आहे.
नवीन ऑटोरिक्षा परवाने देण्यावर 26 नोव्हेंबर 1997 च्या अधिसूचनेनुसार मुंबई, ठाणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद शहरामध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नीसाठी शिथील करण्यात आले आहेत. टंचाई, गारपीट, अवकाळी पाऊस अशी नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि कर्ज फेडण्याचा तगादा अशा कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून सरकार एक लाख रुपये देत आहे. तसेच बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांसाठी ऑटोरिक्षा करिता शंभर टक्के कर्जपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. 
ऑटोरिक्षासाठी सरकारला शंभर टक्के कर्जपुरवठा राज्यातील वित्त पुरवठा करणार्‍या बँका आणि संस्थांकडून अपेक्षित आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरलेले कुटुंबातील विधवा पत्नी परवान्यासाठी पात्र असेल. याशिवाय विधवांना परवाना देताना ऑटोरिक्षा परवाना आणि बॅचची अट सरकारने रद्द केली आहे. ऑटोरिक्षा स्थानिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या इंधनावर चालणार्‍या असतील.
अनुदानाचा हमीसाठी वापर
सरकारतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबाला देण्यात येणार्‍या एक लाख सानुग्रह अनुदानापैकी टपाल अथवा बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेमध्ये 70 हजार रुपयांची ठेव ठेवली जाते. ही ठेव बँकेकडून कर्जपुरवठा घेताना हमी म्हणून वापरता येईल. दरम्यान, विधवा पत्नींना परवाना दिल्यावर पालकत्व संबंधित स्थानिक प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍याकडे राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकार्‍याने ऑटोरिक्षा चालवण्यासाठी पात्र व्यक्तींची अथवा त्रयस्ताची निवड करण्यासाठी परवानाधारक महिलेला मदत, मार्गदर्शन करायचे आहे. त्या व्यक्तीकडून परवानाधारकांसमवेत ठरलेली रक्कम परवानाधारकाच्या बँक खात्यात दररोज जमा होत असल्यावर लक्ष ठेवायचे आहे. शक्यतो सदरच्या व्यक्तीला परवानाधारकाने घेतलेल्या कर्जाबाबत जामीनदार म्हणून नियुक्त करायचे आहे.