Breaking News

नगरदेवळा विकासासाठी पाच कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता


 जळगाव/प्रतिनिधी। 8 - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नगरदेवळ्याच्या (ता. पाचोरा) पाणी पुरवठा योजनेस पावणे पाच कोटींच्या निधीस  प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात अध्यक्षा प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत हा निर्णय झाला. यासह जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कुठल्या योजना हाती घेता येईल, यावर चर्चा करण्यात आली. 
सभेला उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके, नीता चव्हाण, दर्शना घोडेस्वार, मीनाताई पाटील, समितीचे सदस्य इंदिरा पाटील, संजय गरुड, पूनम पाटील यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे आदी उपस्थित होते.
नगरदेवळ्याचा पाणी पुरवठा योजनेचा प्रश्‍न काही दिवसापासून प्रलंबित होता. त्यावर आजच्या सभेत चर्चा होऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी 4 कोटी 77 लाख 90 हजारांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. नळ पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी वाघारा-वाघारीला (ता.पारोळा) 16 लाख 39 हजाराची रक्कम मंजूर करण्यात आली. टंचाई काळात आरोग्य उपकेंद्रांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रलंबित असलेल्या योजना दुरुस्त कराव्यात. तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सदस्यांनी मांडल्या. त्याअनुषंगाने पाणी पुरवठा, सिंचन विभाग काम करत श्री. पाण्डेय यांनी सांगितले. 
आयत्या वेळेच्या विषयात रुइखेडा (ता. मुक्ताईनगर) पाणी पुरवठा योजनेसाठी 2 कोटी 22 लाखांच्या निधीस मान्यता देण्याचा विषय ठेवण्यात आला होता. परंतु आयत्या वेळच्या विषयात इतक्या मोठ्या निधीस मान्यता देण्यात येत असल्याने यास समितीच्या रूपाली चोपडे, रमेश पाटील, डॉ. उद्धव पाटील यांनी विरोध करत तो नामंजूर केला.