Breaking News

सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी देण्याच्या अमिषाने फसवणूक


 जळगाव/प्रतिनिधी। 8 - मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील बर्‍याच जणांना बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सुमारे अठरा ते वीस कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या उमेदवारांनी आज मंत्रालयात जाऊन काही मंत्र्यांची भेट घेतली. जळगाव जिल्ह्यातील काही तरुणांचाही यात समावेश आहे. 
तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासह नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे, कळवण, मालेगाव, चाळीसगाव येथील तरुणांना बांधकाम विभागात नोकरी लावून देतो, असे सांगून माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे सचिव श्यामकुमार मुखर्जी यांनी त्यांच्या सहकार्‍यांमार्फत मोठमोठ्या रकमा घेऊन सन 2013-14 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात विविध जिल्ह्यांतील तरुणांना नियुक्त केले. त्यांना काही महिने या विभागातून पगारही मिळाला. फसवणूक झालेल्या उमेदवारांनीही त्याला दुजोरा दिला. या सर्वांची निवडणुकीच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनी अचानक पगार मिळणे बंद झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना सांगितली होती. त्यांनी योग्य ती चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात आजपर्यंत कुठलीच कार्यवाही झाली नाही.  
सिंचनाबाबत आढावा
शासनाच्या परिपत्रकानुसार अडावद येथे महसूल विभाग, कृषी विभाग, वनविभाग, सिंचन विभाग व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिवार फेरी काढून सिंचनाबाबतचा आढावा घेण्यात आला.