भोसरीमध्ये घरात घुसून मंगळसूत्र आणि मोबाईलची चोरी
भोसरी, 01 - इंद्रायणीनगर येथे राहणार्या एका महिलेच्या घरात खोट्या बहाण्याने घुसून महिलेला हत्याराचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 30) रात्री नऊ वाजता महिलेच्या राहत्या घरी अज्ञात इसमाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घरात घुसून हत्याराचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल असा एकूण 54 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
यावेळी त्या आणि त्यांचा दीड वर्षीय मुलगा घरी रात्रीच्या नऊच्या सुमारास एकटेच होते त्यावेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एक इसम आला पण पत्ता सांगितल्यानंतर तो गेला आणि थोड्या वेळानंतर परत येऊन त्या महिलेला त्यांच्या पतीचे मित्र योगेश पाटील खाली आले आहेत व त्यांनी मला पाठवले आहे असे सांगून त्यांच्या पतीविषयी विचारणा केली. मात्र, तेव्हा महिलेला त्या इसमाची शंका आल्याने त्या त्यांच्या पतीला संपर्क साधण्यासाठी घरातील आतल्या खोलीत गेल्या हीच संधी साधून हा इसम घरात शिरला आणि कोयत्याचा धाक दाखवत त्यांना घरातील ऐवज देण्यासाठी धमकावू लागला. यावेळी त्या महिलेने घरात काही नाही असे सांगितल्यानंतर त्यांने घरातील कपाटे उचकटली पण त्याला तेथे काही सापडले नाही त्यामुळे त्याने त्या महिल ेच्या गळ्यातील 2 तोळ्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल चोरून शस्त्राच्या धाकाने त्यांना घरातील बाथरुममध्ये बांधून ठेवले.
तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास बाळाला आणि नवर्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली व तेथून पळ काढला. पण त्यानंतर महिलेने घरातील गॅलरीमधून आरडाओरडा करुन बाजूच्यांना गोळा केले व त्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक एम. आर. स्वामी तपास करत आहेत.