Breaking News

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गंत मिरज येथे कुष्ठरोग जनजागृती रॅली

सांगली ः दि. 1 -  राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम मोहिमेंतर्गत मिरज येथे कुष्ठरोगाबाबत माहिती देण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. ही माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सांगलीचे सहाय्यक संचालक यांनी दिली.
या रॅलीचे उद्घाटन महात्मा गांधी चौक मिरज येथून सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. एम. एम. चव्हाण, डॉ. कवठेकर, डॉ. रविंद्र ताटे व श्री. मोटरगे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. मनपा दवाखाना लक्ष्मी मार्केट मिरज येथे या रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये भारती विद्यापीठ नर्सींग कॉलेज, वान्लेस हॉस्पिटल नर्सींग इन्स्टीट्युट मिरज, अभिनव नर्सींग स्कूल, मेरी भोरे नर्सींग स्कूल मिरज, गुलाबराव पाटील नर्सींग स्कूल मिरज, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ माधवनगर या कॉलेजचे विद्यार्थी, प्राचार्य व प्राध्यापक यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जागतिक कुष्ठरोग निवारण दिन व दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2016 या कालावधीत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवून लोकांना कुष्ठरोगाबाबत माहिती देण्यात येणार आहे. 
तसेच जिल्ह्यातील 20 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रामध्ये कुष्ठरोग शोध व उपचार मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राकडील कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघर सर्व्हेक्षण करुन संशयित रुग्ण शोधून त्यांचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत.
या मोहिमेंतर्गत दिनांक 2 फेब्रुवारी 2016 रोजी जत शहरामध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शिराळा येथे व 13 फेब्रुवारी रोजी विटा येथे शाळेतील मुलांची प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यात आठवडा बाजार, यात्रा, उरुस, गर्दीच्या ठिकाणी लोकांना कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती देण्यात येणार आहे.