चिंचवड येथे 175 लीटर गावठी दारू जप्त
चिंचवड (प्रतिनिधी)। 01 - राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत चिंचवड येथे 35 लीटर क्षमतेचे 5 प्लास्टिक कॅन इतकी गावठी दारू जप्त करण्यात आली असून यासंदर्भात एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
पंचशील हॉटेल समोरील महात्मा फुले मराठी विद्यालयाच्या समोर, टेल्को रोडवर, चिंचवड पुणे येथे मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी वर्ग वाहन तपासणीस उपस्थित होते. यावेळी मारुती 800 च्या (वाहन क्र. चक-12-ध-2645) वाहन चालकास गाडीमध्ये काय आहे, असे विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावून वाहनाची झाडाझडती घेतली असता, गाडीतील मागच्या डिक्कीत व मधल्या मोकळ्या जागेत काळ्या रंगाचे पाच गावठी दारूने भरलेले अंदाजे 35 लीटर क्षमतेचे प्लास्टिक कॅन मिळून आले. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर व्यक्तीस जागेवरच अटक करण्यात आली.
कुणाल नवनाथ चव्हाण (वय वर्षे 22 रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड), असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कारवाईत 79 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुंबइ दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(क)(ड) प्रमाणे गुन्हा नोंद नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सिंघल, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, अधीक्षक मोहन वर्दे व पिंपरी-चिंचवड उप अधीक्षक फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, ई विभाग पिंपरीचे निरीक्षक आनंद पवार, उप-निरीक्षक सूरज दाबेराव, उप-निरीक्षक मुकुंद परांडकर आणि सहाय्यक दुय्यम निरीक्षक गवारी, जवान सर्वश्री, धनंजय, के. पाटील, रवी लोखंडे, स्वप्नील दरेकर, सूरज घुले व जवान आणि वाहन चालक समीर बिरांजे यांच्या पथकाने केली.