अशोक सोनवणे यांना बहुजनरत्न पुरस्कार प्रदान --- माता-पित्यांच्या सेवेतच महापुरूषांचे विचारांचे आचरण ः प्रा. यशवंत गोसावी
नाशिक/प्रतिनिधी । 7 - केवळ जयंती पुण्यतिथीच्या उत्साहाला निमित्त मात्र ठरून जातीधर्माच्या साखळदंडात आम्हीच जखडून ठेवलेले आमचे महापुरूष पाश्चात्यांना समजले आम्ही मात्र अजूनही त्यांना पारखण्यात शहाणपणा दाखवित नाही अशी खंत सुख्यात व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी व्यक्त केली.
संत गाडगे महाराज विद्रोही विचारमंचाच्या वतीने जिजाऊ, सावित्री, रमाई या राष्ट्र महामाता यांच्या संयुक्त जयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. यशवंत गोसावी बोलत होते.समाज उत्थानासाठी आयुष्य खर्ची घालणार्या विविध क्षेत्रातील समाजोपासकांचाही विचारमंचाच्या वतीने पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात आला. दै. लोकमंथनचे मुख्य संपादक अशोक सोनवणे यांना बहुजनरत्न कॉ. राजू देसले, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे, कु. गोदावरी देवकाटे यांना मी विज्ञानवादी, शशिकांत उन्हवणे यांना बहुजनरत्न, आधारतीर्थ आश्रम यांना सेवाभावी, शिवकार्य गडकोट मोहीम यांना समाजरत्न तसेच किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्रा हटाव आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते विक्की
गायधनी यांना शिवक्रांतीवीर राहूल तुपलोंढे, अजिज पठाण यांना बहुजनरत्न पुरस्कार देऊन गौरवित करण्यात आले. या संयुक्त जयंती महोत्सवास आ. जयंत जाधव, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई सोमैय्या, महिला बालकल्याण समितीच्या सभापती वत्सलाताई खैरे नगरसेवक विनायक खैरे, काळीमातीचे संपादक डॉ.राहूल जैन, जिजाऊ ब्रिगेडच्या माधवी पाटील, स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल गुंजाळ, शिवाजी शेलार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जयंती महोत्सव यशस्वी व्हावा म्हणून प्रफुल्ल वाघ, मदन गाडे पाटील, युवराज पवार यांच्यासह मंचच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.