जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन
श्रीनगर, 7 - जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे 22 डिसेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. अखेर आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मुफ्ती मोहम्मद सईद हे गेल्या वर्षीच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची दुसरी वेळ होती. मात्र आश्चर्य म्हणजे यावेळी सईद यांच्या पीडीपीने चक्क भाजपसोबत युती करून सरकार स्थापले होते. गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभेत मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमोक्रॉटीक पार्टीने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या होत्या. तर दुसर्या क्रमांकावरील भाजपने 25 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन इथे सरकार स्थापन केलं. वेगवेगळ्या भूमिका असलेले दोन पक्ष चक्क एकत्र आल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मुफ्ती यांनी 1 मार्च 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या रूपाने देशाला पहिला मुस्लिम गृहमंत्री मिळाला होता. 1989 ते 90 च्या व्ही पी सिंग सरकारमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री होते. मात्र 1989 साली मुफ्तींचे केंद्रीय गृहमंत्रीपद वेगळ्याच कारणाने गाजले. त्यांची तिसरी कन्या रूबैया हीचे अतिरेक्यांनी
अपहरण केले होते. त्याबदल्यात त्यांनी 5 अतिरेकी सोडण्याची मागणी केली होती.