Breaking News

उत्तर कोरियात हायड्रोजन बॉम्बची चाचणी -- चाचणीमुळे 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाने परिसर हादरला


 सेऊल/वृत्तसंस्था । 7 - उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी विध्वंसक अशा हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतल्याचा दावा केला असून आण्विक शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने उत्तर कोरियाचे हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. 
स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी 10 वाजता पेइचिंग येथील केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान ज्या भागात ही चाचणी घेण्यात आली तेथे बॉम्बच्या स्फोटामुळे भूकंप झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या भौगोलिक सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियातील काही परिसर 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्क्यांनी हादरला. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली त्या पंगेयेरी या ठिकाणापासून भूकंप झालेला परिसर अवघ्या 49 किलोमीटर अंतरावर आहे. हा मानवनिर्मित भूकंप असल्याची आम्हाला शंका आहे, आम्ही सध्या या भूकंपाची नेमकी तीव्रता आणि केंद्र यासंबंधीच्या माहितीचे विश्‍लेषण करत आहोत, अशी माहिती कोरियाच्या हवामान खात्याच्या अधिकार्‍यांकडून राऊटर्स या वृत्तसंस्थेला देण्यात आली.दरम्यान, जपान सरकारने हा भूकंप आण्विक चाचणीमुळे झाला असल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांतील घटना पाहता उत्तर कोरियाने ही आण्विक चाचणी केली असल्याचे जपान सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले.