स्थायी समितीत शिवसेना एकाकी
मुंबई, 7 - बांधकामांना गती देण्यासाठी 25 पर्यंत झाडे तोडण्याची परवानगी देण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना मिळणार आहे. त्यावरून स्थायी समितीत मंगळवारी शिवसेनेने घेतलेल्या हरकतीला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले. झाडे तोडण्याचे किती प्रस्ताव तीन वर्षांत नाकारले, अशी विचारणा करून भाजपने शिवसेनेची कोंडी केली. अन्य पक्षांनीही आयुक्तांना अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याने शिवसेना एकाकी पडली.
बांधकामात अडथळा येत असल्यास कमाल 25 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना मिळणार असून तसा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला. महापालिका आयुक्त नगरसेवकांचे अधिकार कमी करत आहेत, असा आरोप सभागृहाच्या नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आज करत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. हा नियम अंमलात आल्यास वृक्ष प्राधिकरणाची बैठक होणार नाही, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी हरकतीच्या मुद्द्याला जोरदार विरोध केला. बांधकामांना गती दिल्याने विकासाला चालना मिळते. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्राने गुजरातवर आघाडी घेतली आहे. नगरसेवकांचे अधिकार कमी होत असल्याचा आक्षेप चुकीचा आहे. आयुक्तांकडून आलेले किती प्रस्ताव तीन वर्षांत वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर झाले, याची माहिती द्यावी. प्रस्ताव मंजूर होत असतील तर आक्षेप का घ्यावा, असा प्रतिप्रश्न भाजपने केला. याबाबत गटनेत्यांपुढे सादरीकरण झाले होते, असे समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख म्हणाले. वाद चिघळण्याची शक्यता दिसताच स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.