घरांचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण
मुंबई, 7 - म्हाडाच्या ताब्यातील धारावी सेक्टर पाचमधील पहिल्या पात्रता यादीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यात 278 रहिवासी पात्र ठरले असून, म्हाडाने बांधलेल्या टोलेजंग इमारतीतील घरांचा ताबा त्यांना लवकरच दिला जाणार आहे. तारीख निश्चित झाली नसली तरी जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात घराच्या चावी वाटपाचा सोहळा म्हाडाकडून करण्यात येणार आहे.
धारावी सेक्टर पाचच्या पुनर्विकासाची जबाबदारी 2011 मध्ये म्हाडावर सोपवण्यात आली. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेले हे सेक्टर 16 क्लस्टरमध्ये विभागले आहे. त्यापैकी जे क्लस्टरमधील 851 रहिवाशांच्या पात्रतेच्या मोहिमेला म्हाडाने सुरुवात केली होती. म्हाडाने बांधलेल्या इमारतीजवळच जे क्लस्टर असल्याने त्याला प्राधान्य दिले गेले. वारंवार आवाहन केल्यानंतर रहिवाशांनी म्हाडाकडे कागदपत्रे सुपूर्द केली. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाने 504 रहिवाशांची प्रारूप यादी जाहीर केली. हरकती व सूचनांसाठी महिनाभराहून अधिक वेळ गेल्यानंतर अंतिम यादी तयार झाली आहे. त्यात 278 जणांचा समावेश आहे; तसेच सहा दुकानेही त्यात आहेत. म्हाडा मुंबई मंडळांच्या समाज कल्याण विभागाच्या टीमने पात्रतेची प्रक्रिया पूर्ण केली. इमारतीला पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र आधीच मिळाले असून, आता केवळ घराचा ताबा देण्याचे सोपस्कार म्हाडाला पूर्ण करायचे आहेत.धारावीत बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये 358
फ्लॅट्स आहेत.त्या इमारतीमध्ये प्रत्येक रहिवाशाला 300 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. घरांच्या तुलनेत पात्र रहिवाशांची संख्या कमी असल्याने लॉटरी पद्धतीने घरांची सोडत काढली जाणार आहे.