Breaking News

अनाधिकृत बांधकामाविरूद्ध पीएमआरडीएकडून मोहिम

 पुणे (प्रतिनिधी)। 01-  पुणे आणि उपनगर परिसरात झालेल्या अनाधिकृत बांधकामाविरूद्ध पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने आजपासून मोहिम सुरवात करण्यात आली. पीएमआरडीएच्या अनाधिकृत बांधकाम प्रतिंबधक विभागाचे प्रमुख आणि विशेष कार्य अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नर्‍हे आणि आंबेगाव परिसरात अनाधिकृत बांधकामांची माहिती सर्व्हेक्षण करून गोळा केली. 
याबाबत  चव्हाण यांनी सांगितले की, या सर्व्हेक्षणात बहुसंख्य ठिकाणी सुरू असलेली बांधकामे नियमानुसार नसल्याचे आढळले. नियमांचे पालन न करता केलेल्या बांधकाम धारकांना लवकरच नोटिसा बजावल्या जाणार आहेत. ही मोहिम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. सातत्याने सर्व्हेक्षण केले जाऊन अनाधिकृत बांधकामे शोधून काढली जाणार असून फौजदारी कारवाईबरोबरच बांधकामे पाडून टाकण्याची कारवाईही एमआरडीएमार्फत केली जाणार आहे. 
आजच्या सर्व्हेक्षणात सुमारे 55 बांधकामांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यांची मालकी हक्क, विकासक, सात बारा उतारा, बांधकामांची मोजमापे आदीबाबतची माहिती तपासण्यात आली. नियमानुसार नसलेल्या बांधकामांबाबतची सर्व माहिती घेऊन एका आठवड्यात त्यांना नोटिसा बजावण्यात येतील, असे चव्हाण यांनी सांगितले. पीएमआरडीएने अनाधिकृत बांधकामांना प्रतिबंध करण्यासाठी मोबईल प विकसित केले आहे. त्याचाही या मोहिमेत उपयोग होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आजच्या या मोहिमेत तहसिलदार विकास भालेराव  उपअभियंता दुधलवार यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.