चोरट्यांचा शोर अन्य व्यापार्यांना घोर
जालना, 31 - जालना शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या दाणाबाजारात गुरुवारीमध्यरात्री चोरट्यांच्या उपद्रवामुळे चांगलीच दाणादाण उडाली.
दाणाबाजारात गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकाने फोडण्यास सुरवात केली. यामध्ये रामनिवास कुपरचंद, सूरजभान रमेशचंद्र अग्रवाल, चैनराज संजय कुमार, बालकिशन चंदूलाल अग्रवाल व मोहंमद महजर शेख यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रकमेसह, काजू, बदामाच्या बरण्या व अन्य किराणा साहित्य लंपास केले. बालकिशन अग्रवाल यांच्या दुकानातील 20 हजार रुपये रोख लंपास केल्याचे त्यांनी सांगितले. याच गल्लीतील चेतन जनरल स्टोअर्स, सखी इमिटेशन ज्वेलर्स, अंजली स्टील सेंटरसह एका स्वस्त धान्य दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटले. मात्र, येथून चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान, सकाळी रोजच्या वेळेत बाजारात हजर झालेल्या व्यापार्यांना दुकानांचे शटर
उघडे दिसल्यामुळे चोरी झाल्यांचा संशय आला. व्यापार्यांनी ही माहिती सदर बाजार पोलिसांना कळवली. माहिती मिळताच सदर बाजार ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश शेजूळ, अरविंद झावरे, नंदू खंदारे, साई पवार, किरण चेके, कृष्णा तंगे, अशोक जाधव यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला.
एका ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळवले. मात्र, त्यात चोरट्यांच्या हालचाली खूपच अस्पष्ट दिसत असल्याचे सांगण्यात आले. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.