संपादित जमिनीच्या मावेजासाठी 38 कोटी निधी
जालना, 31 - निम्नदुधना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतकर्यांच्या जमिनीच्या मावेजाचा 38 कोटी 61 लाख रुपयांचा निधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पुढाकार घेऊन उपलब्ध करून दिला आहे. गुरुवारी ही माहिती देण्यात आली.
जालना जिल्ह्यातील निम्नदुधना, बरबडा, पाटोदा, धनगर पिंप्री, खडकपूर्णा, सोमठाणा यासारख्या प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मावेजाची रक्कम मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे विभाग व मंत्रालयीन स्तरावरही संबंधित अधिकार्यांच्या दीघकालीन बैठका
घेत प्रकरणनिहाय आढावा घेऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना श्री. लोणीकर यांनी केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री लोणीकर यांनी अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्यादृष्टीने लक्ष वेधले. राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अनेक प्रकल्पासाठी अपुरा
निधी आहे. शासनाकडे उपलब्ध असलेल्या निधीमधून संबंधित प्रकल्पाचे उपलब्ध निधीच्या मर्यादेतच राहून प्रकल्पाचे नियोजनबद्धरीत्या व टप्पानिहाय काम केल्यास काही प्रमाणात का होईना प्रकल्पामध्ये जलसाठा निर्माण होऊन याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होईल. यामुळे येत्या 3 वर्षांत अपूर्ण प्रकल्पाचे काम मार्गी लागण्यास मदत होणार आहे.