सांगलीत मुलीस विकण्याचा प्रयत्न
सांगली ः दि. 7 - घरकामाचे आमिष दाखवून तेरावर्षीय मुलीस इम्रान उर्फ इकबाल शेख या दलालाने सांगलीतील गोकुळनगरमध्ये वेश्या व्यवसायासाठी विकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला. वेश्या एड्स मुकाबला परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने अंधारात पलायन केले.
एवढी गंभीर घटना घडूनही विश्रामबाग पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी यांना निवेदन देऊन, याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, इम्रान शेख हा एका मुलीस गोकुळनगरमध्ये घेऊन आला होता. अनैतिक मानवी व्यापाराविरोधात काम करणार्या वेश्या एड्स मुकाबला परिषदेच्या सदसयांना हा प्रकार समजला. सदस्यांनी चौकशी केल्यानंतर, शेख याने मुलीस घरकाम देण्याच्या आमिषाने आणल्याचे सांगितले. शेखला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला, पण याची चाहूल लागल्याने त्याने पलायन केले. त्यानंतर परिषदेचे सदस्य संबंधित मुलीला घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले. हा प्रकार अनैतिक मानवी व्यापार कायद्यामध्ये बसतो, पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करुन, तिच्या वयाची खातरजमा केली पाहिजे, ती घाबरलेली असून, पोलिसांच्याच ताब्यात आहे.
संबंधित मुलीस तस्करीव्दारे सांंगलीत आणले आहे. तिला वेश्या व्यवसायासाठी विकण्याचा या दलालाचा प्रयत्न आहे. तिचे गाव कोठे आहे, ती दलाल इम्रान शेखच्या जाळ्यात कशी आली, याची चौकशी होणे गरजेचे आहे. यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. परिषदेच्यावतीने अनैतिक मानवी व्यापारी वाहतूकविरोधी कामात पोलिसांना नेहमीच सहकार्य केले आहे. यापूर्वीही मुलींना विकण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकार उघडकीस आणून विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र पोलिसांकडून प्रतिसाद मिळालेला नाही, असे निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनावर परिषदेच्या संचालिका चंदा वजने, सदस्य किरण देशमुख, तंटामुक्ती समिती सदस्या शांताबाई पाटील, माला कांबळे, सुजाता मनोजी, तंगेव्वा तेरदाले यांच्या सह्या आहेत.