रस्तालूट करणारे तिघे वाहनासह गजाआड
अहमदनगर । प्रतिनिधी । 08 (अशोक झोटिंग) - नगर-जामखेड रोडवरील टाकळीकाझी शिवारातील टोलनाक्यावर वाहन चालकास पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणारी तिघांची टोळी कॅम्प पोलिस ठाण्यातील पथकाने गजाआड केली. तिघांकडून चोरीस गेलेला तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपअधिक्षक भोईटे व बनसोडे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर घटनेचा तपास कॅम्प पोलिसांनी करावा अशा सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कॅम्प पोलिस पथकाने अवघ्या काही तासात आरोपी व लुटीतील माल हस्तगत केला. या घटनेबद्दल पोलिस उपअधिक्षकांनी कॅम्प पोलिसांचे अभिनंदन केले आहे. प्रताप सुरेश गडाख (भिस्तबाग), दत्ता बबन काळे (निर्मलनगर), व शहाजी टेमरे (पाईपलाईन रोड) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या घटनेतील मुख्य आरोपी गडाख हा आहे. त्यानेच काळे व टेमरे या दोघांना गुन्ह्यात गुंतविले आहे. काळे व टेमरे हे फरशी बसविण्याचे बिगारी कामगार आहेत. तर गडाख हा अशीच कामधंदे करत असल्याचे पुढे आले आहे. काळे व टेमरे या दोघांना गडाख यांच्याकडून कामाचे पैसे घ्यावयाचे होते. गडाख याच्याकडे दोघांनी पैशांची मागणी केली असता दोघांना बरोबर घेऊन तो जामखेड रस्त्यावर गेला, त्यानंतर गडाख याने चोरीची कल्पना न देता डायरेक्ट वाहन चालकाला अडविले. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून खाली उतरविले.त्याच्या खिशातील पैसे काढून वाहनासह नगरकडे पलायन केले. वाहन चोरल्यानंतर गडाख याने शहरात आल्यानंतर दोघांना उतरवून दिले. त्यानंतर वाहन भिस्तबाग चौकातील घरासमोर लावले. वाहनाचा रंग बदलून काचेवरील नावे खोडून नंबरप्लेट काढली. त्यानंतर वाहनाच्या पुढच्या काचेवर महिलाचे डोळे असलेली प्रतिकृती व मागच्या काचेवर आडला तो नडला असा वाक्प्रचार टाकून छत्रपती शिवाजी महाराजाचे ही चित्र टाकले. हा प्रकार परिसरातील एका जागृत नागरिकाने पाहिला. त्याने ही माहिती कॅम्प पोलिसांना दिली. कॅम्प पोलिस ठाण्याचे कर्मचारी भाऊसाहेब आघाव, भाऊसाहेब काळे, गायकवाड, दिपक शिंदे, यांनी घटनास्थळी जाऊन वाहन चोरीचेच असल्याची खात्री पटविली. त्यानंतर या घटनेची माहिती उपअधिक्षक बनसोडे यांना देण्यात आली. त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात सपोनि.विनोद पाटील, फौ.रवी परदेशी, कर्मचारी दळवी, अनंद सत्रे, राजेंद्र सुद्रीक यांना घटनास्थळी पाठवून आरोपी गडाख याच्या मुसक्या आवळल्या. वाहन व चोरीस गेलेला ऐवज जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरुन पाईपलाईन रोडवरील परिसरातील एका इमारतीचे काम करणार्या काळे व टेमरे याला पकडण्यात आले. तिघांनी घटनेची कबुली दिली. या घटनेतील मुख्य आरोपी गडाख हाच असून त्याने अनेक वाहने चोरली असल्याची शंका व्यक्त करुन पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे.
दोन दिवसापुर्वी नगर तालुका पोलिस ठाण्यात रमेश वाघमारे याने रस्त्यात लुटून वाहनासह ऐवज पळविला असल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 3/2016 भादवि 392, 34/ आर्मअॅक्ट 3/25 अन्वये गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर गुन्हेअन्वेशन शाखा व नगर तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी तपास करीत होते. मात्र, सायंकाळपर्यंत कोणालाही अटक केली नव्हती. त्यानंतर सदर घटनेचा तपास करण्यासाठी ग्रामीणचे उपाध्यक्ष भोईटे यांनी हालचाली सुरु केल्या होत्या. त्यांच्याच आदेशानुसार ही कारवाई भिंगार पोलिसांनी केली.