Breaking News

चळवळ, प्रसारमाध्यमांची मोठी भागीदारी : दाभोलकर


 अहमदनगर । प्रतिनिधी । 08 - अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे नगर जिल्ह्यात खूप मोठे काम आहे. या जिल्ह्यात जातपंचायती विरोधात वाचा फोडण्याचे काम येथील प्रसार माध्यमातून झाले आहे. ही एक संघटना नसून, समाजाला सत्यता दाखवून विकास करणारी चळवळ आहे. यामुळेच अनेक प्रश्‍नांना चळवळीच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या प्रतिनिधी मुक्ता दाभोलकर यांनी केले. 
पत्रकार दिनाच्या निमित्ताने अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित ज्येष्ठ समाजसेवक पत्रकार हाजी अजीजभाई चष्मावाला पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी दाभोलकर बोलत होत्या. यावेळी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पत्रकार संघाचे सुभाष गुंदेचा, दैनिक नगर टाईम्सच्या संपादिका मीनाताई मुनोत, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, राजाराम भापकर गुरुजी आदि उपस्थित होते. दाभोलकर म्हणाल्या की, पुर्वी पासूनच समाजाचा विरोध पत्कारुन समाजसुधारकांनी सत्यासाठी व समाजासाठी कार्य केले आहे. चळवळीचे काम करत असताना प्रसार माध्यमे सत्याच्या बाजूने उभी राहिले. परिस्थिती व शोषणा विरोधात बोलायचे नाही या चुकीच्या समाजाच्या धोरणा विरोधात प्रसारमाध्यमांनी मोलाची भुमिका बजावली. अनिसच्या चळवळीत प्रसारमाध्यमांची भुमिका मोलाची आहे. ही चळवळ कुणाच्या धर्मा विरोधात नसून सर्वच धर्माच्या भोंदूबाबां विरोधात अनिसने गुन्हे दाखल केले आहे. व्यसनाला समाजात मिळत असलेली प्रतिष्ठा हा चुकीची संस्कृती समाजात रुजत असल्याने 
अनिसच्या वतीने नवीन वर्षाच्या पुर्व रात्रीला 31 डिसेंबर रोजी दारु न पिण्याचे आवाहन करत दुध वाटले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रेस क्लबच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे शुभारंभ दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. विकास कांबळे यांनी साकारलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. 
जिल्हाधिकारी अनिल कवडे म्हणाले की, सत्य वचन व प्रामाणिकपणा जीवनाचा पाया आहे. एक चांगली समाजरचना घडवायची असल्यास हा सत्यवचनी व प्रमाणिकपणा सर्वांच्या अंगी आला पाहिजे. पत्रकारांनी अन्यायाच्या विरोधात नेहमीच प्रहार केला आहे. सकारात्मक समाजरचना करण्यासाठी प्रसार माध्यम हे एक  सशक्त साधन आहे.  मात्र वृत्तपत्रातून एक दिवस तरी सर्व सकारात्मक बातम्या याव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकशाहित प्रसार माध्यम हे एक महत्तवाचा स्तंभ आहे. शासनाच्या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे महत्तवाचे काम प्रसारमाध्यमे करतात. सत्याच्या बाजुने लिखाण करणार्या पत्रकारितेला मोठा इतिहास असल्याचे महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले.