Breaking News

विवाहितेच्या आत्महत्त्येप्रकरणी पतीला सक्तमजुरी तर सासु-सासर्‍यास शिक्षा

सांगली ः दि. 30 - करेवाडी (ता. जत) येथील लक्ष्मी महादेव हराळे (25) या विवाहितेचा पैशासाठी छळ करुन तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीला आठ वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंड, तर सासू, सासर्‍याला तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश अभिश्री देव यांनी हा निकाल दिला. पती महादेव भाऊसाहेब हराळे (32), सासू नीलाबाई भाऊसाहेब हराळे (65) व सासरा भाऊसाहेब गंगाराम हराळे (70, तिघे रा. हराळे वस्ती, करेवाडी) अशी शिक्षा झालेल्यांची नांवे आहेत.
लक्ष्मी यांचा महादेव हराळे यांच्याशी 2007 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी तिला एक महिना चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती, सासू व सासरा या तिघांना संगनमत करुन लक्ष्मी यांचा शेतात विहीर खुदाई करण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये आणण्यासाठी शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करु लागले. लक्ष्मी यांनी माहेरी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. माहेरच्यांनी पन्नास हजार रुपये देऊन, लक्ष्मीचा छळ करु नका, असे सांगितले त्यामुळे काही दिवस लक्ष्मी यांच्याशी चांगली वर्तवणूक ठेवली. काही महिन्यानंतर विहीर खुदाईसाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत, यासाठी पुन्हा छळ सुरु केला. माहेरच्यांनी वीस हजार रुपये दिले. पण तरीही छळ सुरुच राहिला. या छळाला कंटाळून त्यांनी 9 जानेवारी 2014 रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केली होती. याप्रकर मृत लक्ष्मी यांची आई महादेवी बंडगर यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या खटल्यात सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील चंद्रकांत माने यांनी महत्वाचे साक्षीदार व वैद्यकीय पुरावे न्यायालयात सादर केले. सहायक जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी अंतिम युक्तिवाद केला होता.