Breaking News

वार्षिक स्नेहसंमेलनामधूनच भविष्यातील कलाकारांची पायाभरणी ः कार्ले

 अहमदनगर । प्रतिनिधी, 1 -प्राथमिक व माध्यममिक शाळांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या वार्षिक स्नेहसंमेलनांमधूनच भविष्यातील उत्कृष्ट कलावंतांची पायाभरणी होत असते. त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये चिमुकल्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देवून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते असे प्रतिपादन नगर तालुका पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी केले. 
नगर तालुक्यातील तांदळी वडगाव जिल्हा परिषद शाळेत यावर्षी प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, बाळासाहेब दरंदले, प्रभाकर भांबरे, तांदळीचे सरपंच अभिलाष घिगे, वडगावचे सरपंच डॉ.अनिल ठोंबरे, सारोळाकासारचे सरपंच रविंद्र कडूस, राळेगणचे सरपंच सुधीर भापकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे नेते यावेळी उपस्थित होते. संदेश कार्ले पुढे म्हणाले खाजगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळाही आता कमी राहिलेल्या नाहीत. सुविधा कमी असतील परंतू गुणवत्तेत मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा उजव्या ठरत आहेत. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्येही विविध गुण असतात. या कलागुणांना अशा स्नेहसंमेलनामुळे वाव मिळतो व भविष्यातील चांगल्या कलावंतांची पायाभरणी अशा कार्यक्रमांमधून होत असते असे ते म्हणाले. तांदळीसारख्या छोट्या गावातील शाळेनेहे चांगल्या पद्धतीने स्नेहसंमेलन आयोजित केल्याबद्दल त्यांनी मुख्याध्यापक पंढरीनाथ पाटील व शिक्षकांचे कौतुक केले.
आ. राहुल जगताप यांनीही या कार्यक्रमास धावती भेट देवून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. मुख्याध्यापक पंढरीनाथ पाटील व शिक्षकांनी या शाळेत प्रथमच असा कार्यक्रम आयोजित केल्याने या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पंढरीनाथ पाटील, शिक्षक श्री. साठे, श्री. डहाळे,  घोडके, श्रीमती साठे, ठोंबरे, माजी सरपंच विलासराव घिगे, रमेश ठोंबरे, आसाराम मुनफन, सतीश ठोंबरे, उपसरपंच राजेंद्र आंधळे यांनी परिश्रम घेतले.