Breaking News

एकदा झालेली चुक पुन्हा नको - आमदार मोनिका राजळे

 अहमदनगर । प्रतिनिधी । 1 - निवडणुकीत  प्रवाहाच्या विरुद्ध राहिल्यास विकासकामांनाही उशींर होतो. गेल्या पाच वर्षांत तालुक्यात सर्वच विकास कामे ठप्प होती. रस्ते विकास थांबला, संजय गांधी योजनेची प्रकरणेही प्रलंबित राहिली. एकदा चूक झालेली पुन्हा होऊ देऊ नका, असे आवाहन करत आमदार मोनिका राजळे यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव टाळत शब्दांत टीका केली. 
तालुक्यातील साकेगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, साकेगाव - चितळी या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला त्या वेळी राजळे बोलत होत्या. जिल्हा परिषद सदस्या योगिता राजळे, मढी देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, वृद्धेश्‍वरचे संचालक चारुदत्त वाघ, सुभाष ताठे, माजी सभापती काकासाहेब शिंदे, माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर, नामदेव लबडे, सरपंच छाया सातपुते आदी प्रमुख उपस्थित होते. 
राजळे म्हणाल्या, पक्षनिष्ठेसह नेत्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून हक्काने विकासकामे करून घेता येतात. साकेगाव एकूणच कासार पिंपळगाव गट राजळेंचा बालेकिल्ला समजला जातो. आगामी काळात ठोस भूमिका घेऊन पुढे या काहींनी राजळेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बालेकिल्ला अभेद्य असल्याने आगामी सर्व निवडणुकांमधून दाखवून द्या. प्रवाहाच्या विरोधात गेल्यास विकासकामाला अडचणी येतात. याची झळ तालुक्यातील टाकळी मानूर, भालगावला बसली. गेल्या निवडणुकीत या भागाने भरभरून मते दिली. गोपीनाथ मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांचे नेतृत्वावर विश्‍वास दाखवत एकतर्फी मतदान केले. चार कोटींचा विकास निधी देत विकास कामे सुरू झाली.