महापालिकेची अवस्था रोजंदार जमीनदारासारखी
औरंगाबाद, 31 - हजारो एकर शेतीचा मालक असूनही दुसर्याच्या शेतावर रोजाने जाणार्यासारखी महापालिकेची अवस्था झाली आहे. अधिकार्यांनी योग्य प्रकारे मालमत्ता कराची वसुली केली तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कामे करा, असे कोणाला सांगण्याची गरज पडणार नाही, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी बजावले.
शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी निवेदन करताना नारेगाव येथे संपूर्ण शहराचा कचरा टाकला जातो. संपूर्ण शहराच्या कचर्याचे ओझे नारेगाववासी सहन करीत असल्याने हा भाग गुंठेवारीत असला तरी त्या वॉर्डासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भूमिगत गटार योजनेची कंत्राटदार कंपनी खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर काही गल्ल्यांमध्ये कामे करून देणार आहे. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृह, संत एकनाथ रंगमंदिरातील खुर्च्यांची दुरवस्था झाली आहे. या खुर्च्यांची उद्योजक अनिल भंडारी सीएसआरमधून दुरुस्ती करून देणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सीएसआरमधून प्राणिसंग्रहालयासाठी 50 कोटी रुपये मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावर महापौर तुपे यांनी शहरातील अनेक कामे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पूर्ण करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत ही चांगली भावना आहे. पॅचवर्कची कामे करणारे कंत्राटदार, चौकांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ते दत्तक घेणारे उद्योजक यांचा एकत्रितपणे सत्कार करण्यात येईल, असे जाहीर करून महापौर म्हणाले, की सामाजिक बांधिलकीतून कामे करून घेण्याची महापालिकेवर ही वेळ का यावी याचा विचार करा.