स्त्रीची ‘पाळी’ आड येते, मग पुरूषाचे काय हो ?
भारतात समान नागरी कायदा व्हावा म्हणून बेंबीच्या देठापासून अवकळा करणारे विद्वान पंडीत दुसर्या बाजुला महिलांना मंदिर प्रवेश नाकरून आपली खरी जात दाखवित आहेत. समान नागरी कायदा व्हावा आणि सर्व नागरिकांना, मग कुठल्याही जाती धर्माचा असो, पंथाचा असो, लिंग कोणतेही असो, स्त्री असो की पुरूष, सर्वांना सारखे अधिकार मिळाले तर कुणीच नाकारणार नाही. मात्र समान नागरी कायद्याची त्यांची आरोळी केवळ भुलभुलैय्या आहे, हेच महिलांना मंदिर प्रवेश बंदीच्या त्यांच्या भुमिकेतून स्पष्ट होत आहे. महिलांना मंदिरात प्रवेश का देऊ नये याचे कुठलेच संदर्भीय, वैज्ञानिक आणि अध्यात्मिकही उत्तर विरोध करण्यार्या मंडळींकडे नाही. मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास देवत्वाची विटंबना होते हा त्यांचा दावा निव्वळ कांगावा आहे. या दाव्याला कुठलाच आधार नाही. हिंदू जागरण समितीने अगदी कालपरवाच शनीशिंगणापूरमद्ये केलेला खुलासा पाहिल्यानंतर त्यांच्याच बुध्दीची किव तर येतेच शिवाय त्यांना खरा हिंदू धर्म आणि शनी समजला का अशी शंकाही आल्याशिवाय रहात नाही. म्हणे शनीशिंगणापूरच्या मुर्तीतून निघणार्या किरणांची तिव्रता प्रचंड आहे. त्यांचा स्त्रीच्या जननक्षमतेवर दुष्परिणाम होतो. ही श्रध्दा की अंधश्रध्दा? एका बाजुला आपण सारी देवाची लेकरे असे मानले तर हा देव आपल्याच लेकरांवर असा अन्याय करील का?
या मंडळींची बुध्दी किती तल्लख आहे हे दाखविणारे आणखी एक उदाहरण त्यांनी स्वतःच दिले. म्हणे, तामिळनाडूत शनीच्या कक्षेतून उपग्रह सोडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न दोनदा फसला. पण कधी, कुठे या प्रश्नांची उत्तरे मात्र त्यांच्याकडे नाहीत. खरा मुद्दा आणि हेतू वेगळाच आहे. धर्माच्या या ठेकेदारांना स्त्रीला उपहासचं जीणं द्यायचं आहे. स्त्रीला गुलामच ठेवायचं आहे. म्हणून हा सारा अट्टाहास सुरू आहे. भारतातच नव्हे, महाराष्ट्रात, महाराष्ट्रातच नव्हे तर नगर, नाशिक सारख्या ग्रामीण भागात अनेक हनुमान मंदिर आणि शनीमुर्तीसमोर जाऊन महिला दर्शन घेतात. मग इतर ठिकाणी असलेल्या या देवतांना देवत्व नाही का? तिथे नाही देवत्वाची विटंबना होत?
अहो, स्त्रीयांनाच दर्शन का नको तर म्हणे, ते चार दिवस अपवित्र असतात. या काळात स्त्री विटाळशी असते. कशी विटाळशी असते हो? या चार दिवसात नेमके काय घडते याचा कधी अभ्यास या ठेकेदारांनी केला आहे का? खरे तर त्या विरोध करणार्या सडलेल्या मेंदूसह तुम्ही आम्ही सारेच त्या चार दिवसांच्या अस्तित्वाचे अपत्य आहोत. शरीरधर्मामुळेच स्त्री माता बनते. त्यालाच ही मंडळी अपवित्र, अमंगल ठरविते आणि आपणही त्यांचे मौन समर्थन करीत त्यांच्या क्रौर्याला साथ देतो. या भारवर्षात सृष्टीतत्व मानवाची निर्माती म्हणून तिच्या जननेंद्रियांची पुजा करण्याचा प्रघात आहे तिचा मासिक स्त्राव ‘जनन क्षम’ म्हणून पवित्र मानला जातो. त्रावणकोर येथे होणार्या ‘त्रिपूरवत्तू’या मातृदेवतेच्या उत्सवात देवीच्या मासिक पाळीच्या वस्त्राचे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडते. केवळ स्पर्शासाठी धडपड होते. तामिळनाडू आणि इशान्य भारतातही असे उत्सव आहेत. प्राचीन भारतातही स्त्री आदराचे स्थान असामान्य आहे. मातृदेवतांची मंदिरेही जागोजागी आहेत. मग आताच महिलांचा द्वेष का?
स्त्री ला मासिक पाळी देवदर्शनाच्या आड येत असेल तर पुरूष चोवीस तास पवित्र असतो असे या मंडळींचा समज आहे का? जो स्त्री स्त्राव अपवित्र मानला जातो तो महिन्यातून केवळ एकदाच, चार दिवस. पण पुरूषाविषयी काय? पुरूषाचं बीज स्खलन कधी होते याचे वेळापत्रक या मंडळींकडे आहे का? बाराही महिने चोवीस तास केव्हाही कुठेही बिजस्खलन (विर्यपतन) होणारे पुरूष मात्र खुले आम कुठेही वावरतात. त्यांना बंदी नसेल तर मग स्त्रीची पाळीच का आड येते? स्त्रीला बंदी घालण्याचे निकष पुरूषांनाही लागू केले तर बाराही महिने पुरूषांना मंदिर प्रवेश बंद करावा लागेल.