Breaking News

एक वृद्ध होरपळला ; घातपाताचा संशय -- निघोज्यातील दलित कुटुंबांचे घर आगीत भस्मसात


 चाणक (प्रतिनिधी) । 08 - येथील डोंगरवस्ती येथे आज पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून, या घरात असलेला 74 वर्षीय इसम या आगीत होरपळला असून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी अग्निबंब पाचारण करण्यात आला मात्र तो पर्यंत घरातील सर्व साहित्य जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा कसून शोध सुरु केला असून रात्री उशिरा पर्यंत पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
विष्णू जानकू जगताप (वय 74 , रा. निघोजे, ता.खेड ) असे या घटनेत होरपळून जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, निघोजे येथील जगताप यांच्या घराला मध्यरात्री दोन च्या सुमारास आग लागली. यावेळी जगताप हे घरात झोपलेले होते.  अन्य कुटुंबीय लगतच्या घरांमध्ये होते. घराला  लागलेल्या आगीने काही क्षणात उग्र रूप धारण केले. आणि संपूर्ण घराला आगीच्या ज्वाळांनी वेढले. आग लागलेल्या घराशेजारील सर्वजण बाहेर पडले. प्रसंगावधान राखून त्यांनी आगीने वेढलेल्या घरातून विष्णू जगताप यांना बाहेर काढले मात्र ते तब्बल 30 टक्के भाजले होते. तत्काळ त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आग विझविण्यासाठी पाणी टाकण्याचा 
प्रयत्न केला. पण घराच्या काही भिंती प्लायवूडच्या असल्याने आगीने अवघ्या  काही क्षणात उग्र रूप धारण केले. त्यातच धुराचा लोटही निर्माण झाल्याने पुढेही जाता येत नव्हते. त्यामुळे आग विझवता येत नव्हती. या आगीत घरातील भांडी, धान्य, रेशनिंग कार्ड, जमिनीची कागदपत्रे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आदी जळून खाक झाले आहे. पोलिसांनी आज घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला आहे. या आगीत सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.  लक्ष्मी रमेश सोनवणे (वय 34) यांची तक्रार चाकण पोलिसांकडून रात्री उशिरा पर्यंत दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरु होती. दरम्यान डोक्यावरचे छप्पर गेले, संसाराला लागणारी भांडीकुंडी, सगळे कपडे, आगीत स्वाहा झाल्याने आता जगायचे कसे, रहायचे कुठे, असा प्रश्‍न संबंधित दलित कुटुंबियांच्या समोर निर्माण झाला असून स्वयंसेवी संस्थांनी त्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.