Breaking News

तळीराम वाहनचालकांना उच्च न्यायालयाचा चाप -- रक्तात किंचित अल्कोहोल आढळले तरी गुन्हा दाखल होणार



 मुंबई/प्रतिनिधी । 8 - मुंबई उच्च न्यायालयाने आज सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना वाहन चालकाच्या रक्तामध्ये किंचित जरी अल्कोहोल आढळले, तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 30 मिली ग्रॅमपेक्षा जास्त रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले, तरच गुन्हा दाखल करण्याचा यापूर्वीचा नियम रद्द करण्यात यावा, त्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती केली जावी, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविताना रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 30 मि.ग्रॅ. किंवा त्या पेक्षा जास्त असल्यास मद्यपीवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असा नियम आहे. मात्र, मद्यपान करून वाहन चालविण्याचे आणि त्यामुळे निष्पाप लोकांचा विनाकारण मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे याबाबत ङ्गझिरो टॉलरन्सफची भूमिका घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्या अभय ओक आणि न्या. गौतम पटेल यांच्या पीठाने हा निकाल उच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी दिला. सन 1949 पासून महाराष्ट्रात दारूबंदी कायदा अस्तित्वात आहे. या तसेच मोटार वाहन कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन वाहन चालविणे गुन्हा आहे. मात्र आतापर्यंत मद्यपी वाहनचालकाच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 30 मि.ग्रॅ. किंवा त्या पेक्षा जास्त असल्यासच त्याला शिक्षा होऊ शकत होती. आता हे प्रमाण 30 मि.ग्रॅ पेक्षा कमी असेल, तरीही मद्यपी वाहनचालकाला शिक्षा केली जाऊ शकते.