Breaking News

 अहमदनगर/प्रतिनिधी । 7 - शनीशिंगणापूरच्या इतिहासात पहिल्यांचा एक ऐतिहासिक घटना बुधवारी घडली असून येथील  शनीशिंगणापूर देवस्थानाच्या विश्‍वस्तमंडळावर पहिल्यांदाच दोन महिलांची निवड करण्यात आली आहे.देवस्थान विश्‍वस्तमंडळावर निवडल्या जाणार्‍या 11 सदस्यांपैकी दोन महिला सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये अनिता शेटे आणि शालिनी लांडे या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अहमदनगर धर्मादाय आयुक्तांमार्फत करण्यात आली.
शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी आहे. मात्र, महिन्याभरापूर्वी एका महिलेने चौथ़र्‍यावर चढून शनीचे दर्शन घेतले होते. त्यामुळे गहजब उडाला होता. या घटनेच्या निषेधार्थ शनिशिंगणापुरात बंद पाळण्यात आला होता. तसेच दुग्धाभिषेकाने चौथर्‍याचे शुद्धीकरणही करण्यात आले. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर महिलांनी पुढाकार घेत विश्‍वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.