Breaking News

अकोलेत भाजपचा एक नेता शिवसेनेच्या गळाला


अकोले / प्रतिनिधी 
विधानसभेच्या निवडणुका एका वर्षावर येवून ठेपलेल्या असतानाच, अकोले तालुक्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचा एक नेता शिवसेनेच्या गळाला लागला असून, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर येवून ठेपली आहे.त्यामुळे यापुढील काळात, भाजप शिवसेना पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. अकोले तालुक्यात शिवसेना हा दोन नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे भाजपपेक्षाही शिवसेना उमेदवाराला या मतदार संघात जास्त मते मिळतात. तसेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती झाल्यास ही जागा शिवसेनेला सोडली जाईल. त्यामुळे युती धर्माचे पालन म्हणून भाजपला शिवसेनेसोबत जावेच लागेल. युतीचा संभाव्य धोका पाहून भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याने शिवसेना नेत्यांकडे आपली सेटिंग लावली आहे.हा भाजपचा नेता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची आता अकोले तालुक्यात सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे स्वबळावर भाजपचा आमदार करू, अशा वल्गना करणार्‍या कार्यकर्त्यांना व नेत्यांनाही धोक्याची घंटा आहे.त्यामुळे भाजप पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. भाजपाचा हा इच्छूक उमेदवार शिवसेनेच्या पथ्यावर पडणारा असून, शिवसेना नेत्यांकडून त्याला हिरवा कंदील देखील मिळाला आहे. मात्र शिवसेना पक्षातून उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या तोंडातील घास हिरावला असल्याची चर्चा सुरु आहे. भाजप नेत्याच्या इनकमिंगमुळे मुळ शिवसैनिकांमध्येदेखील नाराजी पसरण्याची शक्यता आहे. तिकिटावरून नाराज झालेले इच्छूक उमेदवार ऐनवेळी बंडखोरी करतील. त्यामुळे तिरंगी, चौरंगी लढतीत राष्ट्रवादी पक्षच बाजी मारेल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. दरम्यान भाजपचा हा नेता आता अधिकृतरित्या शिवसेनेत येवून हातात शिवबंधन कधी बांधील, याकडे संपूर्ण अकोले विधानसभा मतदार संघाचे लक्ष लागले आहे.