Breaking News

दरोड्याच्या तयारीत असणारे दोघे जेरबंद; काहीजण फरार


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
तालुक्यातील मांडवगण गणपती मळा परिसरातील रस्त्याचे कडेला काही संशयीत व्यक्ती दबा धरून बसले असल्याबाबत पो. नि. बाजीराव पोवार यांना माहिती मिळाल्याने पो.नि. पोवार, पो.उप.निरी. महावीर जाधव, पो.कॉ. प्रकाश वाघ, पो.कॉ. दादासाहेब टाके, पो.कॉ. उत्तम राऊत, पो.कॉ. अमोल शिंदे यांनी सदर मार्गावर जावून पाहिले असता, रस्त्यावर पुलाचे आडोशाला काही व्यक्ती रोडच्या दोन्ही बाजूला बसलेले दिसून आले. पोलिसांना पाहून त्यांचेकडील मोटारसायकली जागीच टाकून पळून जात असताना, त्यापैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले, यामध्ये आकेश आजीनाथ काळे (वय 18), इंकर आल्या भोसले (वय 16 वर्षे) दोघे रा. केडगाव अ. नगर येथील आहेत. त्यांचेकडे पळून गेलेल्या सहकार्‍यांबद्दल चौकशी केली असता, त्यांनी, अजय मोहन काळे, रा. तांदळी ता. श्रीगोंदा, शालींदर सिद्धिकर चव्हाण, नितीन सिद्धिकर चव्हाण दोघेही रा. गुंडेगाव ता.जि. नगर असे सांगितले. पकडलेल्या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांचेकडे, दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले साहित्य त्यामध्ये मिरची पावडर, 20 फूट लांबीची नायलॉन दोरी, एमएच16 सीबी4147 क्रमांकाची शाइन गाडी, एमएच 16 सीबी 9035 हिरो डिलक्स गाडी, असा एकून 45 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधितांकडे चौकशी केली असता, त्यांनी रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या लोकांना लुटणार असल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे दरोडा टाकण्याच्या तयारीबाबत भादवि 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.