स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य असलेले लंडनमधील ओल्ड इंडिया हाऊस सरकारने विकत घेऊन त्याठिकाणी त्यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी ज्येष्ठ प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या अंदमान पर्व या कार्यक्रमात बोलताना केली. डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे यांच्या व्याख्यानसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह तुडुंब भरले होते. यावेळी भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे यांचीदेखील उपस्थिती होती. एकाच विचारांवर कार्य करणा-या एकाच परिवारातील तिन्ही पिढ्या एकाच ठिकाणी यानिमित्ताने उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर व कार्यवाह राजेंद्र वराडकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके संयोजन मुकुंद गोडबोले यांनी केले तर सूत्रसंचालन हेमंत बर्वे यांचे होते. ब्रिटिशांच्या काळात बंदिवानांच्या सवलतीसाठी असलेल्या अटी म्हणजे त्यांना तुरुंगाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जागेत स्वतंत्रपणे राहता येत होते तसेच त्यांच्यासाठी छापील असलेल्या करारावर सह्या कराव्या लागत असत. त्यामुळे राजबंदी अशा कायदेशीर सवलतीसाठी सरसकट ज्या छापील अर्जावर सह्या होत, त्याच अर्जावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही सही करावी लागली होती तसेच देशभरातील नागरिकांच्या प्रक्षोभामुळे त्यांना मूळ भूमीत स्वतंत्रपणे राहण्याची मुभा रत्नागिरीच्या ठिकाणी दिली गेली. मात्र त्याच्यावर सरकारचे नियंत्रण असल्यामुळे ती स्थानबद्धता होती. मात्र, जाणीवपूर्वक ही बाब चुकीच्या पद्धतीने प्रसारित करून सावरकरांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने विरोधकांनी रंगविली आहे, हे ध्यानात घेऊन यापुढे ही बाब आपण प्रकर्षाने त्यांच्या निदर्शनास आणली पाहिजे, असे आवाहनदेखील सच्चिदानंद शेवडे यांनी केले. शिक्षा म्हणून स्वातंत्र्यवीरांना अंदमान तर इतरांना आगा खान पॅलेसमध्ये ठेवणे ही बाब ब्रिटिशांनी कशा पद्धतीने प्रतिकूल व अनुकूल नेत्यांसाठी केलेला भेद आहे, हे ध्यानात आणतो, त्याचबरोबर त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पोर्ट ब्लेअरला सावरकर नगरी असे नाव द्यावे तर भारतीय स्वातंत्र्यसैनिकांवर अन्न्वित व अमानुष अत्याचार करणा-या रक्तरंजित घटनांनी ज्यांची कारकिर्द मलिन आहे, त्या नील आणि हॅवलॉक यांच्या नावे असलेल्या अंदमान येथील बंदरांचही नाव तत्काळ बदलावे, कारण हा कलंक आपण पुसला पाहिजे, असे मत डॉ. परिक्षित शेवडे यांनी व्यक्त केले. दोन्ही पितापुत्रांनी अदंमान पर्व हे देशाला तत्कालीन परिस्थितीबरोबरच आज वर्तमानात आणि भविष्यातदेखील प्रेरणा देणारे कसे आहे, तसेच सावरकरांबद्दलचा प्रचार कशापद्धतीने चुकीचा होता, तसेच विद्वानांनी बुद्धिभेद कसा आहे, याचा पुरेपूर समाचार या दरम्यान घेऊन वास्तविकता श्रोत्यांपुढे सोदाहरण स्पष्ट केली. त्याला उपस्थितांनी मनापासून दाद दिली.