रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मनिष नय्यर व सचिवपदी डॉ.विनोद मोरे यांची एकमताने निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनची सन 2018-19 साठी नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून, अध्यक्षपदी मनिष लालचंद नय्यर तर सचिवपदी डॉ.विनोद मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
रोटरी क्लब ही जागतिक दर्जाची संघटना असून, भारतासह परदेशात देखील संघटनेच्या वतीने सामाजिक कार्य चालू असतात. मागील वर्षी क्लबच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. यावर्षी देखील क्लबच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण, रक्तदान, आरोग्य सुविधा, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, युवकांना रोजगाराच्या संधी व दुर्बल घटकांना मदतीबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची भावना नुतन अध्यक्ष मनिष नय्यर यांनी व्यक्त केली. मिळालेल्या संधीच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे डॉ.विनोद मोरे यांनी सांगितले. मनिष नय्यर हे प्रसिध्द उद्योजक असून, डॉ.विनोद मोरे दंतरोग तज्ञ आहेत. त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान व अनुभवाची दखल घेत त्यांची क्लबच्या अध्यक्ष व सचिवपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.