नाशिक जिल्हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शासनाकडून सर्वप्रकारे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड येथे उभारण्यात आलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टच्या अध्यक्षा यु. एन. नंदेश्वर आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, देशात आर्थिक पर्यटनाला अधिक महत्व आहे त्यामुळे तीर्थस्थळांचा विचार करतांना भाविकांना चांगल्या सुविधा पुरविल्या तर तेवढीच चांगली अर्थव्यवस्था उभी रहाते. फ्युनिक्युलर ट्रॉलीची सुविधा उपलब्ध झाल्याने गडाच्या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, देवीच्या शक्तीपीठाकडे जाण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशातील पहिला प्रयोग या ठिकाणी करण्यात आला आहे. इथल्या सुविधा जागतिक दर्जाच्या असून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांना आईचे दर्शन सहजपणे घेता येईल. गडावरील पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. महाजन म्हणाले, त्र्यंबकेश्वर , सप्तशृंग गड, नाशिक आणि शिर्डी येथील पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वर येथे शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेतून पायाभूत सुविधांचा विकास करणयाबरोबरच रोप-वेची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा असा शासनाचा प्रयत्न आहे. फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे भाविकांना देवीचे दर्शन घेणे आधिक सुलभ होईल. गडावर डोलीचा व्यवसाय करणाऱ्यांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कालाग्राम, अंजनेरी ट्रॅकिंग सेंटरसह पर्यटनाचे रखडलेले अनेक प्रकल्प पूर्ण करून सुरू करावे. तसेच नाशिक जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे देखील काम लवकरात पूर्ण करावा आणि महाराष्ट्राला या पाण्याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले. भुसे म्हणाले, सप्तशृंगी गडाचा ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळामध्ये समावेश करण्यात आला असून गडावरील विकासाला चालना देण्यासाठी 25 कोटींचा आरार करण्यात आला आहे. गड परिसरात पर्यटन विकासाच्या दृष्टीने कामे करण्यात येतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाझर तलाव नुतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्पुर्वी गडावरील भवानी पाझर तलाव नुतनीकरण कलोकार्पण केले. त्यांनी कामाची पहाणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तलावाच्या माती धरणाची लांबी 180 मी. असून धरणाची साठवण क्षमता 6.68 द.ल.घ.फूट आहे. चणकापूर धरण येथून 25 कि.मी.ची थेट पाईपलाईन करण्यात आली आहे. या तलावाच्या नुतनीकरणामुळे भाविकांसाठी पाण्याची चांगली सुविधा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्लास्टिक बाटल्यांवर प्रक्रिया करण्याच्या यंत्राचे उद्घाटन देखील मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आले.