Breaking News

रेल्वेच्या क्षमतेत दुप्पट वाढ करण्याचा निर्धार - पियुष गोयल

पुणे : अत्याधुनिक तंत्रन्यानाचा प्रभावी वापर करून आगामी 4 ते 5 वर्षात रेल्वेच्या क्षमतेत दुप्पट वाढ करण्याचा निर्धार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मोदी सरकारच्या गेल्या 4 वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना त्यांनी रेल्वे आणि कोळसा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामांचा अहवाल यावेळी सादर केला.या काळात आम्ही रेल्वेची कार्यक्षमता आणि फायदेशीरता वाढवण्याचा प्रयत्न करताना खर्चात कपात आणि प्रवाश्याना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या दृष्टीने काम केल्याचे ते म्हणाले. आगामी काळात देशातील 6 हजार प्रमुख स्थानकांवर मोफत वाई फाइ सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे गोयल म्हणाले. त्याच बरोबर येत्या वर्षभरात सर्व रेल्वेमध्ये बायो टॉयलेटची सुविधा दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठीच्या भूसंपादनाचा प्रश्‍न चर्चेतून सोडवला जाईल असं स्पष्ट करतानाच कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याचा निर्धार गोयल यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सध्या काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या भूमिकेमुळे या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनात अडथळे निर्माण झाले असले तरी सर्व प्रश्‍न चर्चेतून सुटू शकतात या भावनेतून आम्ही त्यांचे सर्व आक्षेप दूर करू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे गोयल यांनी अन्य एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.