Breaking News

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पाणी टँकरच्या संख्येत घट

नाशिक, दि. 28, जून - यंदा टंचाईच्या झळा तीव्र जाणवल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी आतापर्यंत सुमारे 89 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता, मात्र गेल्या पाच दिवसांमध्ये जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे ही संख्या 11 ने घटली असून आजमितीस जिल्हयात 78 टँकरव्दारे 301 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्यास 30 जूननंतर 2 टँकर सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढीच्या प्रस्तावाला मान्यता घेणे आवश्यक ठरणार आहे. 
यंदाच्यावर्षी तपमानाच्या पार्याने चाळिशी पार केल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या तीव्रता वाढली. विशेष म्हणजे राज्य शासनामार्फत गेल्या चार वर्षांपासून टँकरमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त अ भियान राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्हा या अभियानात अग्रेसर असल्याचा डंका प्रशासनाकडून सातत्याने वाजवला जातो. मात्र, प्रत्यक्षात ग्रामीण भागात आजही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष दिसून येते. त्यामुळे यंदा जानेवारीपासूनच टँकरची मागणी होऊ लागली. अगदी जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील 149 गावे आणि 231 वाड्या अशा एकूण 380 गावांना 92 टँकर मंजूर करण्यात होते. त्यापैकी प्रत्यक्षात 89 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मे 2017 मध्ये या काळात सुमारे 60 च्या आसपास टँकर सुरू होते.
यंदा जानेवारीपासूनच टँकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले. मात्र, जलयुक्तचे अपयश लपविण्यासाठी की, काय या प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत प्रशासनाने हात आखडता घेतला.मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने टँकरच्या संख्येतही घट होऊ लागली आहे. आजमितीस जिल्ह्यातील 106 गावे आणि 195 वाड्या अशा एकूण 301 गावांना 78 ट ँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चांदवड, दिंडोरी, कळवण, नाशिक, निफाड, पेठ, त्र्यंबक तालुक्यातील टँकर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्यास 30 जूननंतरही काही तालुक्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. 
तालुकानिहाय पाणीपुरवठा
तालुका टँकर
येवला 21
बागलाण 15
सिन्नर 13
मालेगाव 11
नांदगाव 09
देवळा 03
इगतपुरी 02
सुरगाणा 04