Breaking News

जीवनात संघर्ष महत्वाचा -आय.ए. एस. इरा सिंघल


प्रतिकूल परिस्थिती माणसाला संघर्ष करण्याची प्रेरणा देते. संघर्षाद्वारेच प्रतिकूल शारिरीक परिस्थितीवरही मात करून यश मिळवता येते. तीन वेळा अपयश येऊनही त्यातून धडाघेत यू. पी. एस. सी. परीक्षेत भारतातून सर्व प्रथम येण्याचा मला मान मिळाला, असे स्वउदाहरणाद्वारे आय. ए. एस. इरा सिंघल यांनी स्पष्ट केले. युवान आयोजित ‘प्रेरणा’कार्यक्रमाच्या आठव्या पर्वात त्या बोलत होत्या. भाषणाऐवजी आपल्या मनमोकळ्या शैलीत त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी व पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळीप्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी युवान युवकांसाठी करत असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे सांगितले. याचा उपयोग करून युवकांनी देशनिर्माणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यु. पी. एस. सी. परीक्षेत यंदा महाराष्ट्रातून सर्वप्रथम आलेल्या गिरीश बदोले यांनीही आपला संघर्षमय जीवनप्रवास उलगडला. दुष्काळी भागात राहूनही उच्च ध्येय ठेऊन अथकपरिश्रम केल्यानेच यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातून यंदा यु. पी. एस. सी. परीक्षेत यश मिळवलेल्या वैभव गायकवाड, सुधीर केकाण, अमित काळे,अविनाश चव्हाण, हर्षल पाटील या भूमिपुत्रांचा विशेष सन्मान नरेंद्र फिरोदिया, सी. ए. अशोक पितळे, प्रतिभाजी धूत या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मागील वर्षभरातउल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सद्दाम पठाण, शीतल गायकवाड, आकाश जाधव, दिनेश जाधव या युवान विद्यार्थ्यांचाही कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी ‘प्रेरणा’ कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. नव-अधिकाऱ्यांना प्रोत्साहन, दिशा मिळावी आणिविद्यार्थ्यांना या अधिकाऱ्यांच्या संघर्षातून प्रेरणा मिळावी, हा कार्यक्रम आयोजनामागील हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार सुरेश मैडयांनी मानले. प्रणिता बोरा हिने बाबा आमटे रचित “थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा” हे सुंदर गीत सादर केले. तर समारोपास गायक गिरीराज जाधव यांनी आपल्या अनोख्याशैलीत गिटारवर ‘वंदे मातरम हे गीत सादर केले. अतिशय देशभक्तीपर आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाचा समारोप झाला. रेडिओ सिटी ९१.१ एफ.एम. कार्यक्रमाचे रेडिओ पार्टनर होते. तर 'आय लव्ह नगर' कार्यक्रमाचे डिजिटल मीडिया पार्टनर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माय टिफिन, व्ही.आर. डी. इ. सेवा समिती, मिनर्व्हा इन्फ्रा यांनी विशेष सहयोग दिला. नेहमीप्रमाणे युवानच्या कार्यक्रमासाठी झालेली गर्दी यावेळीही उच्चान्क मोडणारी ठरली. सभागृहात बसायला जागा नसतांनाही अनेकांनी खाली बसून कार्यक्रमातून प्रेरणामिळवली.