Breaking News

अकोलेत चोरीचे मोबाईल विकणारी टोळी सक्रीय


अकोले / प्रतिनिधी 
शहरात चोरीच्या महागड्या मोबाईलांची विक्री करणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीच्या संपर्कात अकोले तालुक्यातील अनेक मोबाईल विक्रेते आहे. अनेक नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल कवडीमोल किंमतीत विकण्याचा धंदाच ही टोळी आरामात करीत आहे.
नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणाहून येणारे चोरीचे मोबाईल अकोले शहरातील काही मोबाईल विक्रेते खरेदी करीत आहेत. मोबाईल विक्रेते चोरीच्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरशी छेडछाड करून हे मोबाईल विक्रीसाठी बाजारात दाखल करीत आहेत.अ‍ॅपल, सॅमसंग, सोनी, विवो, एमआय या कंपन्यांचे अतिशय महागडे मोबाईल अवघ्या पाच ते दहा हजारात विकले जात आहेत. काही चाणाक्ष नागरिक हे मोबाईल खरेदी वेळी बिलाची मागणी करतात. अशावेळी हे मोबाईल विक्रेते आपल्या दुकानाचे बनावट बिल नागरिकांना देवून त्यांची दिशाभूल करतात.नामांकित कंपनीचा मोबाईल कवडीमोल किंमतीत मिळतो, तसेच मोबाईलचे बिलदेखील मिळत असल्याने नागरिक निःसंकोचपणे या मोबाईलची खरेदी करतात. अकोले शहरासह संपूर्ण तालुक्यात या चोरीचे मोबाईल विकणार्‍या टोळीने धूमाकुळ घातला आहे. या टोळीत प्रामुख्याने कॉलेजच्या मुलांचा सहभाग दिसून येतो.आता कॉलेज सुरू झाल्यामुळे अशा चोरीच्या मोबाईलची विक्री मुलांमध्येच सुरू आहे. मुलांच्या पालकांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. आपल्या मुलाकडे महागडा मोबाईल कसा काय आला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. या मोबाईल चोरीच्या टोळीकडे पोलीस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने या टोळीला एकप्रकारे अभय मिळत आहे. अकोलेच्या आठवडे बाजारातदेखील या टोळीचे काही पंटर घिरट्या घालताना दिसून येतात. त्यामुळे या बाजारातुन अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या टोळीचा अकोलेतील काही दुकानदारांशी थेट संबध येत असल्याने पोलिस प्रशासनाला कारवाई करताना अडचणी येत आहेत. पोलीस प्रशासनाने या टोळीचा छडा लावल्यास अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे उजेडात येतील.