साईमंदिर परिसरात पाकिटमारीमध्ये घट : भोईटे
शिर्डी / प्रतिनिधी : शिर्डी पोलीस आणि साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षक यांनी ठरविले तर काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय साईभक्तांना आला. साईमंदिर परिसरात पाकिटमारी, बनावट पास यातून साईभक्तांचे आर्थिक शोषण केले जात होते. यंत्र, हार, प्रसाद खरेदी करताना साई भक्तांची आर्थिक लूट करणे, व्ही.आय.पी. दर्शनाच्या आमिषाने होत असलेली फसवणूक आदींबाबत ९०० सुरक्षा रक्षकांची मदत घेण्यात आली. या संयुक्त कारवाईने साईमंदिर परिसरात पाकिटमारीमध्ये घट झाल्याचे साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी असलेले पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांनी सांगितले.
ते म्हणाले, साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता आणि जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या कारवाईमुळे सहा महिन्यांत हे सर्व प्रकार मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात यश मिळाले. अनेक वर्षांपासून मंदिरासह परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण हे साईभक्तांचे आर्थिक शोषण करीत असत. यासाठी साईबाबा संस्थानचा पदभार घेतल्यानंतर नियोजनबद्ध आराखडा तयार केला. शिर्डीत वर्षाकाठी काही कोटी भाविक साईदर्शनासाठी येतात. त्या भक्तांना चांगले दर्शन व त्रास होणार नाही, यासाठी संस्थान व विश्वस्त मंडळ कायमच काळजी घेत असते. संस्थानचे सर्व सुरक्षा रक्षक आणि व पोलिसांनी सहकार्य केल्यामुळे यश मिळाले.