Breaking News

धोम धरणातील दुषित पाणी बेतले मोठ्या माशांच्या जीवावर

सातारा, दि. 07, जून - धोम धरणात सध्या पाण्याचा मृतसाठा शिल्लक असून पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे.त्यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचा जीव टांगणीला लागला आहे. धरणात पाणीच शिल्लक नसल्याने उर्वरित पाण्यातूनच पर्यटक रपेट मारण्यासाठी बोटिंग करतात, त्यामुळे पाणी गढूळ होवून आत असणार्‍या माशांचा जीव जात असल्याचे निदर्शनास आले आहे. बोटिंग क्लब जवळ दहा ते पंधरा किलोचा मासा मृत अवस्थेत धरणाच्या किना-यावर वाहत आला. त्याला प्रचंड दुर्गंधयुक्त वास येत असल्याने मरून दोन-तीन दिवसांचा कालावधी झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे अनेक मासे मृत अवस्थेत त्या पाण्यात असण्याची शक्यता आहे. परंतु धोम पाटबंधारे खात्याच्या गलथान पणामुळे पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहण्यास अडचण येत आहे. बेसुमार कालव्यात पाणी सोडल्याने धोम धरणात पाण्याचा खडखडाट झाला आहे. त्यातच धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साठल्याने किती पाणी शिल्लक आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे धरणातील जलचर प्राण्यांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र दुर्दैवाने सध्या धरण परिसरात पहावयास मिळत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येत असल्याने मासेमारी करणारा ठेकेदार वेगवेगळ्या क्लुपत्या लढवून मासेमारी करीत त्यामुळे मासे मरण्याचे प्रमाण वाढले आहे.