मिताली राजचा विक्रम; टी-२० मध्ये २ हजार धावा
मुंबई
टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने अनोख्या विक्रमाची नोंद करत २ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. इतकी धावसंख्या उभारणार मिताली पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मिताली सध्या मलेशियात महिला आशिया चषकात खेळते आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मितालीने २३ चेंडूत ३३ धावांची खेळी केली, यादरम्यान मितालीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजेमितालीचा अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला हा विक्रम साधता आलेला नाहीये. विराट कोहलीच्या खात्यावर सध्या १९८३ धावा जमा आहेत. त्यामुळे मितालीने केलेली कामगिरी ही विशेष ठरली आहे.
दोन हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही सातवी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीमध्ये इंग्लंडची कार्लोस एडवर्ड्स ही २६०५ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजची डेंड्रा डॉटिन २०३९ धावांसहमिताली राजच्या काही स्थानं पुढे आहे. मलेशियात सुरु असलेल्या आशियाई चषकात भारतीय संघाने आतापर्यंत ३ सामने जिंकले असून भारताला फक्त बांगलादेशविरुद्ध सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. यास्पर्धेत भारताचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.