Breaking News

ठेंगोडा सुत गिरणीचा संशयास्पद व्यवहार रद्द करण्याची प्रहारची मागणी,चार कोटीची मालमत्ता विकली अवघ्या 95 लाखात

नाशिक/ प्रतिनिधी
ठेंगोडा सुत गिरणीचा मालमत्ता विक्री व्यवहार संशयास्पद असल्यामुळे या व्यवहाराची चौकशी करून तो रद्द करावा, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
या संदर्भात प्रहार संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात या व्यवहारात ठेंगोडा ग्रामपालिकेला अंधारात ठेवून थकबाकीही दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. प्रहारने केलेल्या दाव्यानुसार नाशिक जिल्हा सहकारी सुतगिरणी ठेंगोडा या संस्थेचे मालमत्ता मुल्य शासनाने चार कोटी इतके निर्धारीत केले आहे. या सुतगिरणीवर शिखर बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अंदाजे 1.5 कोटी, वीज बील 2 कोटी थकबाकी आहे. शिवाय सुतगिरणीकडून कामगारांचे सुमारे 5 कोटी रूपये घेणे आहेत. सुत गिरणीच्या सुमारे 40 एकर जमिनीची बँक थकीत वसूली करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जाहीर नोटीस न करता संशयास्पद लिलाव करून ग्रामपालिकेलाही अंधारात ठेवण्यात आले आहे. शासनाने निर्धारीत केलेले चार कोटी मुल्यांकन दुर्लक्षित करून अवघ्या 95 लाखात ही जमीन विक्री करण्यात आल्याचा प्रहारचा आरोप आहे. या व्यवहारामुळे सुत गिरणीचे 500 कामगार त्यांच्या 5 कोटी थकीत वेतनाला वंचित राहण्याची भिती प्रहारने व्यक्त केली आहे.
20 वर्षापासून शासनाने अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक सटाणा यांना नियूक्त केले असताना त्यांचा पदभार अचानक काढून जिल्हा बँकेचे नामपूर विभागीय अधिकार्‍यांना मालमत्ता विक्रीचे अधिकार देण्यामागच्या गौडबंगालावर प्रहारने आक्षेप नोंदवला आहे. म्हणूनच हा सर्व व्यवहार संशयास्पद असून या व्यवहाराची चौकशी करून तो रद्द करण्याची मागणी प्रहारने केली आहे. आठ दिवसात या निवेदनावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारने दिला आहे. या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष कृष्णा जाधव, सटाणा तालुका अध्यक्ष तुषार खैरनार यांच्या स्वाक्षरी असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सहकार मंत्री, आ. बच्चू कडू, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक सटाणा तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.