Breaking News

भाडे थकल्याने बाजार समितीने केले पोस्ट कार्यालय सील


राहुरी :  राहुरी बाजार समितीच्या मुख्य आवारातील राहुरीचे उपडाकघर (पोस्ट कार्यालय) थकित भाड्यापोटी आज {दि. १७ } सायंकाळी बाजार समिती प्रशासनाकडून सीलबंद करण्यात आले. अनेक वर्षांपासूनची राहुरी उप डाकघरची येथील इमारत बंद झाल्याने व पोस्ट कार्यालयाने बाजार समितीच्या नोटीसीला गांभिर्याने न घेतल्याने पोस्ट कार्यालयावर ही नामुष्की ओढवली.
राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या पोस्ट कार्यालयाची इमारत गेली अनेक वर्षे नागरिकांना सुविधा देत होती. बाजार समितीच्या आवारातील शेतकरी निवासची इमारत १९८५ मध्ये यासाठी भाड्याने देण्यात आली होती. त्यावेळी ७९० रुपये भाड्याप्रमाणे बाजार समितीने पाच वर्षांचा करार केला होता. कराराची मुदत संपल्यानंतर औरंगाबादच्या टपाल कार्यालयाने इमारतीची पाहणी करुन दरमहा तीन हजार चारशे रुपये भाडे निश्चित केले. तसे पत्र पोस्ट खात्याच्या श्रीरामपूर कार्यालयास दि. १२ जूलै १९९० रोजी दिले. त्यानुसार १ जानेवारी १९९० ते ३१ मार्च २०१७ अखेर विलंब शुल्कासह १३ लाख २२ हजार १३ रुपये भाड्याची बाजार समितीची मागणी होती. आजअखेर तिच्यात वाढ होत गेली. बाजार समितीने नाममात्र भाडे करारावर स्वतः च्या जागेतील इमारत नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन दिली होती. पोस्ट कार्यालयास स्वमालकीची जागा व इमारत नसल्याने बाजार समितीच्या आवारात पोस्ट कार्यालय सुरु होते. मात्र भाडेकरार व त्यापोटी देय असलेली गेल्या अठ्ठावीस वर्षांपासूनची थकबाकी साधारण १४ ते १५ लाख रुपये थकित असल्याचे समजते. गेल्या वर्षी जूलै २०१७ मध्ये देखील बाजार समितीने नोटीस बजावून भाडे न दिल्यामुळे कारवाई केली होती. परंतू त्यावेळी श्रीरामपुर विभागीय डाकघरच्या अधिकाऱ्यांनी राहुरीमधे येत बाजार समिती प्रशासनाशी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. 

त्यावेळी झालेली कारवाई सकाळी पोस्ट कार्यालय बंद केल्याने दुपारी काही तासानंतर खुले करण्यात आले होते. मात्र जूलै २०१७ नंतर आजतागायत १० महिने बाजार समितीने मुदत देवूनदेखील डाक कार्यालयाकडून प्रतिसाद व भाडे न मिळाल्याने आज सायंकाळी अखेर बाजार समिती प्रशासनाने येथील उपडाकघर सिलबंद केले. या इमारतीच्या आतील टेबल खुर्ची व इतर साहित्यासह सिल केले आणि दरवाजांना कुलूप ठोकले. इमारत सिलबंद केल्याचे पत्र यावेळी डकविण्यात आले. अनेक वर्षे येथे नागरिकांना सुविधा देणारी इमारत सिल झाल्याने जनतेची गैरसोय तर डाक कार्यालयाच्या अनास्थेमुळे नामुष्की ओढवण्याची वेळ येवून ठेपली. राहुरी नगरपरिषदेचादेखील पोस्ट कार्यालयाकडे जूलै २०१७ अखेर १ लाख ५९ हजार ७२२ रुपये कर थकित आहे. त्यातही आजअखेर वाढच होत गेली आहे.