लग्नसमारंभात सत्कारास फाटा देत जपली सामाजिक बांधीलकी! उद्योजक साबळेंकडून झाडांना पाणी देण्यासाठी अडीच हजारांची देणगी
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथिल रहिवाशी मात्र व्यावसायानिमित्त चिखली (पुणे) येथे वास्तव्यास असलेले उद्योजक राजेंद्र साबळे यांनी आपल्या मुलाच्या लग्नात सत्कार समारंभास फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत, स्मशानभूमी परिसरातील झाडांना पाणी देण्यासाठी 2500 रुपये, महादेव मंदिर जिर्णोद्धारासाठी 11,111 रुपये तसेच सासवड येथिल झाडांना पाणी देण्यासाठी 5 हजारांची देणगी उपसरपंच दौलत गांगर्डे यांच्याकडे सुपूर्द केली. साबळे - जगताप यांचा शुभविवाह सोमवारी वाडेगव्हाण फाटा येथिल न्यू दुर्गा लॉन्स मध्ये पार पडला यावेळी ही देणगी देण्यात आली. 3 वर्षापूर्वी निसर्गराजा मित्र जिवांचे पुणे यांच्यामार्फत साबळे यांनी स्मशानभुमी परिसरात सुमारे 201 झाडांचे वृक्षारोपण केले. मात्र जानेवारी पासून झाडांना पाणी न दिल्याने पाण्याअभावी झाडे जळून जात होती. झाडांना पाणी देण्यासाठी अनेक मासिक सभांमध्ये विषय होवून देखिल दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होत असतांना उद्योजक साबळे यांनी देणगी दिल्याने या झाडांना जिवदान मिळणार आहे. काल भोयरे गांगर्डा स्मशानभूमी परिसरातील झाडांना पाणी सोडण्यात आले. टँकर भरण्यासाठी राजू डोंगरे यांचेकडून मोफत पाणी देण्यात आले. यावेळी उपसरपंच दौलत गांगर्डे, सेवा सोसायटीचे संचालक आप्पासाहेब रसाळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष माणिक पवार, सुदाम पवार, सुरज रसाळ, सुरेश पाडळे आदी उपस्थित होते. यापुर्वी ग्रामपंचायत व संचालक आप्पासाहेब रसाळ यांनी या झाडांना मोफत पाणी दिले, मात्र 3 वर्षे जतन केलेल्या झाडांना जानेवारी पासून पाणी नसल्याने झाडे जळू लागली आहेत.