नान्नजमधील वस्त्यांवर दररोज सापांच्या दर्शनाने नागरिकांत भितीचे सावट
जामखेड / ता.प्रतिनिधी । 11 - तालुक्यातील नान्नज येथे रासकर मळा या गावालगत व कुंभारवाडा वस्तीजवळ असणार्या भागात विषारी सापांचे प्रमाण वाढले असल्याने या परीसरात रोज विषारी सापाचा मुक्त संचार निदर्शनास येत असल्याने परीसरातील महिलांसह नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन, यांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे साप नागरिकांच्या निदर्शनास येतात. सापांच्या दिसण्याने नागरिक वस्तीवर राहण्यासदेखील घाबरत आहेत. वन अधिकार्यांनी या सापांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. नेहमी सांगीतले जाते, साप हा शेतकर्याचा मित्र असतो, कारण तो नेहमी शेतीतील उपद्रव देणारे किडे अथवा अळ्या किंवा इतर किटक खातो. अप्रत्यक्ष शेतकर्यांच्या पिकाचे रक्षण करत असतो. त्यामुळे सापास मारू नये असे सांगीतले जाते, मात्र मनुष्य वस्तीतच त्यांचा संचार अथवा वावर सुरु झाल्यास नागरीक मात्र संभ्रमात पडतात. असाच काहीसा प्रकार जामखेड तालुक्यातोल नान्नज या गावात रासकर मळा या गावालगत व नदीकिनार्यावर सुरू आहे. येथे लागुनच भिमनगर, साठेनगर तसेच कुंभारवाडा परीसर असल्याने या परीसरातुन या सर्व नागरीकांचा रोज वहिवाट असतो, त्यामुळे या विषारी सापाच्या रोजच्या दर्शनाने परीसरातील नागरीक भयभीत झाले असुन, सर्पमित्र अथवा वनविभागाने यात लक्ष घालुन याचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी महिलांसह ग्रामस्थ करत आहेत.